भिंत कोसळून पाच ठार

By Admin | Updated: June 23, 2015 02:32 IST2015-06-23T02:32:24+5:302015-06-23T02:32:24+5:30

कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये अर्धवट बांधलेले जोते घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला

The wall collapsed and killed five | भिंत कोसळून पाच ठार

भिंत कोसळून पाच ठार

नेरळ (जि. रायगड) : कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये अर्धवट बांधलेले जोते घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या कुटुंबातील एक मुलगा नातेवाइकांकडे गेला होता, त्यामुळे तो वाचला.
किसन राघो दिघे (५0), सुनंदा (४५), अर्चना (२0), स्वप्नेश (१९) आणि सुनंदा यांच्या आई जाईबाई कदम (६५) अशी मृतांची नावे असून त्यांच्या नातेवाइकांना सरकारकडून तत्काळ २० लाखांची मदत देण्यात आली. किसन दिघे यांच्या घराच्या वरच्या बाजूस असलेल्या अर्धवट बांधलेल्या घराचे जोते मुसळधार पाण्याने भुसभुशीत झाले होते. पहाटे ५.३0च्या सुमारास माती व दगडी भिंत खचली आणि दिघे यांच्या घरावर कोसळली. परिसरातील रहिवाशांनी आणि नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भरावाखाली दबलेल्या दिघे कुटुंबीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पाचही जणांचा मृत्यू झाला होता. स्वप्नेश दिघे हा रविवारी रात्री मासे आणि खेकडे पकडण्यासाठी गेला होता. तो पहाटे घरी परतला. मात्र काहीच तासांत काळाने त्याच्यावर घाला घातला. शवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी व्यवस्था नसल्याने मृतदेह दुपारपर्यंत उघड्यावरच ठेवण्यात आले होते.

Web Title: The wall collapsed and killed five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.