सत्र न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेला जाग
By Admin | Updated: July 20, 2016 05:54 IST2016-07-20T05:54:11+5:302016-07-20T05:54:11+5:30
सत्र न्यायालयातील निद्रावस्थेत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आल्यानंतर संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले

सत्र न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेला जाग
मुंबई : सत्र न्यायालयातील निद्रावस्थेत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आल्यानंतर संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आहे. न्यायालय परिसरात आढळलेल्या दारूच्या बाटल्यांची सफाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे उच्च न्यायालयाचे महानिबंधक मंगेश पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कुलाबा येथील सत्र न्यायालयात अतिसंवेदनशील खटले चालतात. असे असतानाही येथील पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या आढळल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला. याची खातरजमा केल्यानंतर, याबाबतच्या वास्तवाला मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली. त्यानंतर, बाटल्या हटवण्यात आल्या. आज सकाळपासून सत्र न्यायालयातील सुरक्षा अधिक कडक केलेली पाहावयास मिळाली. या वेळी सामान्य नागरिकांबरोबरच वकिलांचीही सुरक्षा तपासणी करण्यात आली. वकिलांना ओळखपत्रांशिवाय आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे वकील आणि पोलिसांमध्ये वादही झाला. सत्र न्यायालयाच्या आवाराची झाडाझडती घेण्यात आली. आणखी कुठे काही आहे का, याची पाहणी तेथील पोलिसांनी केली. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे उच्च न्यायालयाचे महानिबंधक मंगेश पाटील यांनी सांगितले.
मात्र, या घटनेनंतरही परिमंडळ १ चे उपायुक्त मनोज शर्मा मात्र अजूनही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून यावर बोलणे टाळले.
सत्र न्यायालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला. याबातच्या वास्तवाला मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली होती.