ते दोघे एकत्र कधी येणार ?
केडीएमसी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते व्हावे, असा युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. १७ जानेवारीला केडीएमसीच्या कार्यक्रमात हे वाटप करण्यात येणार होते. पण त्यावेळी एकनाथ शिंदे हजर नव्हते. २९ जानेवारीला माजी आ. जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले पण खा. शिंदे अनुपस्थित राहिल्याने त्यावेळीही हे वाटप बारगळले. त्यामुळे हे दोघे कधी एकत्र येतील आणि धनादेशाचे वितरण कधी होईल, अशी कुजबुज सुरू आहे.
सभागृहातील आठवणी
नगरसेवक ते मंत्री, असा प्रताप सरनाईक यांचा प्रवास झाला आहे. नगरसेवक असताना सरनाईक हे नेहमी विरोधी बाकावरच बसलेले होते. ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे स्व. अरविंद पेंडसे सभागृह हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. या सभागृहात त्यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. कालांतराने सरनाईक सत्ताधारी पक्षात सहभागी झाले आणि त्यानंतर आमदार आणि आता परिवहन खात्याचे मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. एका बैठकीसंदर्भात पालिकेतील त्याच सभागृहात जाण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
गृहजिल्हा सदस्य नोंदणीचे काय?
भाजपची देशभर सदस्य नोंदणी सुरू आहे. ज्या जिल्ह्याने, शहराने सदस्यता नोंदणीचे टार्गेट पूर्ण केले, त्यांचे पत्र देऊन काैतुक करण्याचे सत्र नवे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुरू केले आहे. तसेच चव्हाण हे नोंदणीचा आढावा घेत आहेत. मुंबईत बैठक घेऊन त्यांनी झाडाझडतीही घेतली. नुकतीच त्यांनी पनवेलला भेट दिली. चव्हाण यांचा गृहजिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. यापैकी महापालिकांच्या एकाही शहरात अद्याप त्यांनी कौतुकाचे पत्र दिलेले नाही. यामुळे साहेब जरा गृह जिल्ह्याकडे पाहा ना राव असे काही कार्यकर्ते म्हणताना दिसले.
कोणाचे ऑपरेशन कोण करणार?
उद्धवसेना आणि शिंदेसेनेत सध्या ऑपरेशनवरून वाकयुद्ध सुरू आहे. उद्धवसेनेतील अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच ‘ऑपरेशन टायगर’ होईल, असे विधान नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले होते. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन अमित शहा करतील अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. आता त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडी करत संजय राऊतांचे ऑपरेशन कधी होईल हे त्यांनाही कळणार नाही, असा टोला लगावला. दोन्ही शिवसेना नेत्यांतील या शाब्दिक युद्धात नक्की कोण कोणाचे कधी ऑपरेशन करणार अशी कुजबुज सुरू झाली आहे.