८० टक्केदेय रकमेतील ४६५ कोटींची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 6, 2016 00:32 IST2016-01-05T23:44:52+5:302016-01-06T00:32:36+5:30
दहा कारखान्यांकडून पूर्ण रक्कम : चार कारखान्यांची दमडीही नाही

८० टक्केदेय रकमेतील ४६५ कोटींची प्रतीक्षा
राजाराम लोंढे-- कोल्हापूर विभागातील बहुतांश साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे ८० टक्केप्रमाणे ४६५ कोटी ३७ लाख रुपये देय रक्कम असून, केवळ दहा कारखान्यांनी पूर्ण पैसे दिले आहेत. चार कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्यापासून गाळपास आलेल्या उसाची एक दमडीही दिलेली नाही. साखरेच्या कोसळलेल्या दरामुळे एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना शक्य नव्हते. शेतकरी संघटना व कारखानदार आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने एफआरपीचा गुंता तयार झाला होता. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करत १५ डिसेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाचे एफआरपी पैकी ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपूर्वी देण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात १५ डिसेंबरअखेर ३८ लाख ०३ हजार टन, तर सांगली जिल्ह्यात २१ लाख ४६ हजार, असे ५९ लाख ५० हजार २१८ टन गाळप झाले आहे. याची एफआरपीप्रमाणे १४७६ कोटी ९३ लाख रुपये देय रक्कम असून, ८० टक्केप्रमाणे ११८१ कोटी ५४ लाख रुपये शेतकऱ्यांना डिसेंबरअखेर देणे बंधनकारक होते; परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील ‘बिद्री’, ‘दालमिया शुगर्स-आसुर्ले’, ‘जवाहर-हुपरी’, ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, तर सांगली जिल्ह्यातील ‘किसन अहिर-वाळवा’, ‘मोहनराव शिंदे- आरग’, ‘सद्गुरू’, उदगिरी’, ‘सद्गुरू’ या दहा कारखान्यांनीच ८० टक्केप्रमाणे १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे पैसे दिले आहेत. तर ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘महाकाली’, ‘माणगंगा’, ‘यशवंत’ या चार कारखान्यांनी गाळप सुरू झाल्यापासून एक रुपयाही शेतकऱ्यांना दिला नसल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अहवालावरून स्पष्ट होते. सरकारने आदेश देऊनही काही कारखान्यांनी कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे आता साखर आयुक्त काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.