वेटरकडे क्रेडिट, डेबिट कार्ड देणे पडू शकते महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 19:28 IST2017-07-19T19:28:21+5:302017-07-19T19:28:21+5:30
तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर बिल भरण्यासाठी तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड वेटरकडे देत असाल तर सावधान. त्यामुळे तुमची कार्डमधील गुप्त माहिती चोरीला जाऊ

वेटरकडे क्रेडिट, डेबिट कार्ड देणे पडू शकते महागात
>ऑनलान लोकमत
मुंबई, दि. 19 - तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर बिल भरण्यासाठी तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड वेटरकडे देत असाल तर सावधान. त्यामुळे तुमची कार्डमधील गुप्त माहिती चोरीला जाऊ शकते. ग्राहकांच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डवरील गुप्त माहिती चोरून कार्डचे क्लोनिंग करणाऱ्या वेटर आणि आयटी एक्सपर्टच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यात काम करणारे सहा वेटर्स आणि दोन आयटी एक्सपर्ट्सना गेल्या आठवड्यात अटक केली आहे. या वेटर्सनी 1 हजार 28 ग्राहकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील माहिती चोरल्याचे उघडकीस आले आहे. आयटी व्यावसायिकांनी विविध हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्सशी संगनमत करून हा धंदा सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी अधिक माहिती देताना वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले की, माहिती चोरलेल्या प्रत्येक कार्डमागे वेटर्सना एक हजार रुपये मिळत असत. या माध्यमातून प्रत्येक वेटर दरमहिन्याला 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करत असे.
वेटर एक वा दोन कार्डमधील माहिती कॉपी करून सुरुवात करत असत. नंतर हात बसल्यावर ते दरमहा 40 ते 40 कार्डमधील माहितीची चोरी करत असत. असेही पोलिसांनी सांगितले. तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डमधील आपल्या माहितीची चोरी होऊ नये म्हणून वेटरकडे आपल्या कार्डचा पीन देऊ नये तसेच कार्ड स्वाइप करताना काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.