रुग्णवाहिकेला वाट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 04:50 IST2016-09-05T04:50:15+5:302016-09-05T04:50:15+5:30

विघ्नहर्त्याच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरल्याने महाराष्ट्रात उत्साही वातावरण असताना त्याचा फटका रुग्णांना बसू नये

Wait for the ambulance | रुग्णवाहिकेला वाट द्या

रुग्णवाहिकेला वाट द्या

जमीर काझी,

मुंबई- विघ्नहर्त्याच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरल्याने महाराष्ट्रात उत्साही वातावरण असताना त्याचा फटका रुग्णांना बसू नये, यासाठी पोलिसांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. वाहने सावकाश चालवा, रुग्णवाहिकेला वाट करून द्या, अशी साद राज्यभरातील पोलिसांकडून गणेशभक्तांना घातली जाणार आहे. मिरवणूक व सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना बेशिस्त वाहनांमुळे अपघात होऊ नये, तसेच रुग्णांना वेळेत रुग्णालयामध्ये नेता यावे, यासाठी ‘गणपती उत्सव थीम-२०१६’ ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.
राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी त्याबाबत पोस्टर लावून नागरिकांना आवाहन करावे, अशी सूचना पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना केली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मिरवणूक, वाहनांच्या गर्दीमुळे रुग्णांना घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यास अडथळा होत असतो. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचे काम मुंबईतील राधी डिझास्टर अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने केले जाते. त्यानुसार प्रत्येक पोलीस घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या कालावधीत रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आल्यास मार्गावरील वाहने डाव्या बाजूला ठेवणे तसेच हळू चालविण्याबाबत गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करावयाची आहे. (प्रतिनिधी)
>नागरिकांनी खबरदारी घ्यावी
महाराष्ट्रात नऊ पोलीस आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालये आहेत. त्याअंतर्गत एकूण १ हजार ७६ पोलीस ठाणी असून, त्यांच्या हद्दीतील प्रत्येक गणेशोत्सव मंडळामार्फत ‘स्लो ड्राइव्ह आणि वे टू अ‍ॅम्ब्युलन्स’ याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना कोणतीही दुर्घटना
घडू नये, यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. अपघातात एकूण मृत्युमुखी पडणाऱ्या दर पाच व्यक्तींमध्ये एकाचा मृत्यू हा वेळेत उपचार न मिळाल्याने होतो. त्यामुळे याबाबत प्रत्येक पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सव मंडळांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाईल.
- सतीश माथूर (पोलीस महासंचालक)

Web Title: Wait for the ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.