खापरीत वॅगनला आग
By Admin | Updated: July 10, 2014 00:58 IST2014-07-10T00:58:20+5:302014-07-10T00:58:20+5:30
खापरी रेल्वेस्थानकावर एका वॅगनला बुधवारी दुपारी ४.१० वाजता अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची सूचना देताच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर

खापरीत वॅगनला आग
अनर्थ टळला : रेल्वे प्रशासनात खळबळ
नागपूर : खापरी रेल्वेस्थानकावर एका वॅगनला बुधवारी दुपारी ४.१० वाजता अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली.
आगीची सूचना देताच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर दुपारी ४.३० वाजेपर्यंत नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे सहा रेल्वेगाड्यांना नागपूर, अजनी, गुमगाव रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले. दरम्यान, खापरी रेल्वेस्थानकावर उभी असलेली ही वॅगन मार्च महिन्यापासून तेथे उभी असल्यामुळे रेल्वे प्रशासन सुरक्षेप्रति किती गंभीर आहे,
याची प्रचिती आली.खापरी रेल्वेस्थानकावर मार्च महिन्यापासून उभ्या असलेल्या एका वॅगनच्या पाहणीसाठी एचपीसीएल आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचे अधिकारी दुपारी ४.१० वाजता खापरी रेल्वेस्थानकावर पोहोचले. हे वॅगन नागपूर एण्डकडे रेल्वेस्थानकापासून ४०० मीटर अंतरावर होते. पाहणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी या वॅगनची तपासणी करण्यासाठी वॅगनचे झाकण उघडताच अचानक आग लागली. यामुळे एकच गोंधळ उडाला.
लगेच आगीची सूचना अग्निशमन विभागास देण्यात आली. अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचून दुपारी ४.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीची सूचना मिळताच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
यामुळे रेल्वेगाडी क्रमांक ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेसला गुमगाव स्टेशनवर ४.४० ते सायंकाळी ६ पर्यंत, १२५१२ राप्तीसागर एक्स्प्रेसला गुमगाव स्टेशनवर दुपारी ४.५६ ते सायंकाळी ५.५२, १२८३३ हावडा एक्स्प्रेस बुटीबोरी स्टेशनवर १ तास, १२९०६ हावडा-पोरबंदर-ओखाला अजनी स्टेशनवर दुपारी ४.२५ ते सायंकाळी ६.०५, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसला अजनी स्टेशनवर सायंकाळी ५.३८ ते ६.०८ पर्यंत आणि १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसला नागपूर स्टेशनवर २० मिनिटे थांबवून ठेवण्यात आले. आग लागलेली वॅगन मार्च महिन्यापासून खापरी रेल्वेस्थानकावर उभी असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)