ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" या गाण्यातून मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढणा-या रेड एफएमची आर.जे. मलिष्का सध्या चांगलीच चर्चेत आहे. पावसाळ्यात मुंबईत उडणा-या दैनावर तिने सादर केलेले गीत सत्ताधारी शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. महापालिकेची बदनामी होत असल्याने मलिष्काविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याच्या विचारात शिवसेना आहे. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मलिष्काला पाठिंबा दिला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करुन मलिष्काला पाठिंबा दिला आहे.
मलिष्का तु एकटी नाही..आम्ही आहोत तुझ्या बरोबर..वाघोबा करतो म्याव म्याव..आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!! असं ट्विट करत नितेश यांनी मलिष्काला पाठिंबा तर दिलाच शिवाय शिवसेनेची तुलना मांजर म्हणून डिवचायची आलेली आयती संधी त्यांनी पुन्हा एकदा साधली.
रेडिओ जॉकी मलिष्काचे गीत मुंबई मनपातील सत्ताधारी शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. यामुळे मलिष्का मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांना तपासणीदरम्यान मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं मलिष्काला नोटीस बजावली आहे.
मुंबई, मला तुझ्यावर भरोसा आहे ! RJ मलिष्काचा मनपाला टोला-
या सर्व घटनाक्रमादरम्यान, मुंबईकर मलिष्काला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. यासंदर्भात मलिष्काने ट्विट करुन मुंबईकरांचे, मुंबईचे आभार मानले आहेत. ""मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे"", असे ट्विट मलिष्कानं केले आहे.
तर दुसरीकडे महापालिकेच्या अधिका-यांनी मलिष्का राहत असलेल्या इमारतीची मंगळवारी (18 जुलै )तपासणी केली. यावेळी महानगरपालिकेच्या अधिका-यांना तपासणीदरम्यान मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं मलिष्काला नोटीस बजावली आहे.
वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील सन राईज इमारतीमध्ये बुधवारी एच वेस्ट वॉर्ड कार्यालयाच्या अधिका-यांनी तपासणी केली असता लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. शोभेच्या कुंडीखाली ठेवलेल्या डिशमध्ये साठलेल्या पाण्यात या अळ्या सापडल्या. लिली मेंडोंसा ( ६५ वर्ष) म्हणजे मलिष्काची आई असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.