चंद्रपूरमध्ये उमा नदीच्या पात्रात वाघिणीचा मृतदेह
By Admin | Updated: April 9, 2016 03:17 IST2016-04-09T03:17:35+5:302016-04-09T03:17:35+5:30
सिंदेवाही वनपरिक्षेत्र आणि पळसगाव वनपरिक्षेत्रातील उमा नदीच्या पात्रात शुक्रवारी सकाळी वाघीण मृतावस्थेत आढळली.

चंद्रपूरमध्ये उमा नदीच्या पात्रात वाघिणीचा मृतदेह
नवरगाव (जि. चंद्रपूर) : सिंदेवाही वनपरिक्षेत्र आणि पळसगाव वनपरिक्षेत्रातील उमा नदीच्या पात्रात शुक्रवारी सकाळी वाघीण मृतावस्थेत आढळली. वाघिणीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तिच्या शरीरावर खोल जखमा आढळून आल्या आहेत.
रत्नापूरपासून सहा किमी अंतरावर धोब घाटाच्या परिसरातील उमा नदीच्या पात्रात मृत वाघीण पाण्यावर तरंगताना पळसगाव वनपरिक्षेत्रातील वनरक्षक ई.व्ही. जांभुळे यांना आढळली. वाघिणीचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृत वाघिणीचे वय अंदाजे चार ते पाच वर्षांचे असावे. पायाचे नख, पंजे व मिशा कायम असून शरीरावर खोलवर जखमा झाल्यानेच तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाण्यात उतरताना पडली असावी व पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तथापि, मृत्यूचा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण कळू शकणार आहे. (वार्ताहर)