वडापाव दुकानदाराला उल्हासनगरमध्ये जिवंत जाळले
By Admin | Updated: March 21, 2017 04:14 IST2017-03-21T04:14:46+5:302017-03-21T04:14:46+5:30
वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान ‘महालक्ष्मी जम्बो वडापाव’ दुकानदार चंदू रामरख्यानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात झाले.

वडापाव दुकानदाराला उल्हासनगरमध्ये जिवंत जाळले
उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात समोरासमोर वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान ‘महालक्ष्मी जम्बो वडापाव’ दुकानदार चंदू रामरख्यानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात झाले. रामरख्यानी हे ९० टक्के भाजले असून, त्यांना नवी मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. रामरख्यानी यांना जाळण्याचा प्रयत्न करणारा सुरेश आहुजा हा फरार झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ४, रेल्वे स्टेशनबाहेर रामरख्यानी यांनी दुकान भाड्याने घेऊन वडापाव सेंटर सुरू केले. यापूर्वी सुरेश आहुजा याने हे दुकान भाड्याने घेऊन वडापावचा धंदा केला होता. महालक्ष्मी सेंटरसमोर आहुजा याचे नवीन वडापाव दुकान मंगळवारपासून सुरू होण्याची कुणकुण रामरख्यानी यांना लागली होती. याबाबत, आक्षेप घेतल्याने सुरेश व रामरख्यानी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या रागातून सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आहुजाने बाटलीतून आणलेले पेट्रोल रामरख्यानी यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले. भरदिवसा घडलेल्या या अमानुष घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामरख्यानी हे ९० टक्के भाजले असून, त्यांच्यावर सुरुवातीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी दिली. आरोपी आहुजा हा फरार झाला आहे. उल्हासनगरात दोन दिवसांपूर्वी दारुड्या जावयाने घर आतून बंद करून सासूसह पत्नी, मेहुणी, भाची यांना मारहाण करून ठार मारण्याच्या हेतूने घर पेटवून दिले होते. (प्रतिनिधी)