महापौर निवडणुकीत भाजपाने केले शिवसेनेला मतदान
By Admin | Updated: March 8, 2017 14:20 IST2017-03-08T11:22:33+5:302017-03-08T14:20:46+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात परस्परांवर अत्यंत बोच-या शब्दात टीका करणारे शिवसेना आणि भाजपा महापौरपदाच्या निवडणुकीत मात्र एकत्र आले.

महापौर निवडणुकीत भाजपाने केले शिवसेनेला मतदान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात परस्परांवर अत्यंत बोच-या शब्दात टीका करणारे शिवसेना आणि भाजपा महापौरपदाच्या निवडणुकीत मात्र एकत्र आले. त्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या. भाजपाच्या माघारीमुळे ही निवडणूक फक्त औपचारिकता मात्र उरली होती. गरज पडल्यास शिवसेनेला मतदान करु असे भाजपाने म्हटले होते. त्यानुसार भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवाराचे समर्थन केले. अजूनही महाडेश्वर यांच्या विजयाची घोषणा झालेली नाही. महापालिकेबाहेर शिवसैनिकांची ढोल-ताशे, गुलाल उधळून जल्लोष सुरु आहे.
शिवसेनेचे संख्याबळ 84 असून, चार अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने औपचारीकता म्हणून महापौरपदासाठी विठ्ठल लोकर आणि उपमहापौरपदासाठी विन्नी डिसुझा यांना रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक भगव्या फेटयांमध्ये सभागृहात उपस्थित राहतील.
महापौर निवडीच्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विश्वानाथ महाडेश्वर पालिका वसाहतीमधील घराच्या मुद्यावरुन अडचणीत सापडले आहेत. भविष्यात न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेल्यास त्यांचे महापौरपद अडचणीत येण्याची शक्यता आहे.