केंद्रांच्या स्थलांतरामुळे मतदारांची होणार दमछाक
By Admin | Updated: October 15, 2014 04:07 IST2014-10-15T04:07:47+5:302014-10-15T04:07:47+5:30
कल्याण पश्चिम मतदारसंघातील ३१ मतदान केंद्रांचे सुविधांअभावी स्थलांतर करण्यात आले आहे.

केंद्रांच्या स्थलांतरामुळे मतदारांची होणार दमछाक
कल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघातील ३१ मतदान केंद्रांचे सुविधांअभावी स्थलांतर करण्यात आले आहे. परंतु, निवडणूक विभागाने दिलेल्या व्होटर स्लीपवर जुन्याच मतदान केंद्रांचे पत्ते छापल्याने मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे. त्यात काही केंद्रे दूरवर गेल्याने मतदारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
येथील पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्रे आहेत. यातील काही केंद्रांच्या इमारती या धोकादायक असल्याने तसेच त्या ठिकाणी योग्य त्या सुविधा नसल्याने आधारवाडी, वाडेघर आणि चिकणघर या परिसरांतील केंद्रांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आधारवाडी येथील श्री कॉम्प्लेक्स येथे वाडेघर येथील केंद्र वायलेनगर आणि आग्रा रोडवरील मोहिंदरसिंग हायस्कूल तर चिकणघर परिसरातील केंद्र बिर्ला महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. जुन्या आणि नव्या मतदान केंद्रांमध्ये एक ते दीड किमीचे अंतर असल्याने मतदारांची नव्या केंद्रांवर पोहोचताना दमछाक होणार आहे.
निवडणूक विभागाने पुरविलेल्या व्होटर स्लीपवर जुन्या केंद्राचा पत्ता दिला गेल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. अंतिम टप्प्यात मतदान केंद्रे बदलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याने व्होटर स्लीपवरील पत्ता बदलण्यास अवधी मिळाला नाही, जुन्या केंद्राच्या ठिकाणी नव्या केंद्राची सूचना लावण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या पश्चिम विधानसभा कार्यालयातून देण्यात आली. (प्रतिनिधी)