मुंबईत मतदारसंख्या घटली

By Admin | Updated: July 9, 2016 02:04 IST2016-07-09T02:04:39+5:302016-07-09T02:04:39+5:30

प्रत्येक निवडणुकीला जनजागृती करूनही मतदान सरासरी ५० टक्केच राहिल्याचे आणि मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटल्याचे उघडकीस आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत

Voters fall in Mumbai | मुंबईत मतदारसंख्या घटली

मुंबईत मतदारसंख्या घटली

मुंबई : प्रत्येक निवडणुकीला जनजागृती करूनही मतदान सरासरी ५० टक्केच राहिल्याचे आणि मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटल्याचे उघडकीस आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे़
त्यानुसार, महाविद्यालयांत मतदार नोंदणी अर्ज वाटणे, शाळांमध्ये निवडणुकीसंदर्भात स्पर्धा आयोजित करणे आणि प्रसिद्ध अभिनेत्यांमार्फत संदेश देण्याचा कार्यक्रम महापालिकेने आखला आहे़
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१७ नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे़ त्यापूर्वी म्हणजे २० डिसेंबरपर्यंत नवीन मतदार, मतदार यादीतून नाव गायब असलेले मतदार, स्थालांतरित मतदार अशा सर्वांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता किंवा अद्ययावत करता येणार आहे़ यासाठी असलेल्या केंद्रांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे़

पुढील वर्षी सज्ञान होणारेही मतदार
१ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मतदार होता येणार आहे़ यासाठी सप्टेंबरपासून राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणी मोहीम सुरू होणार आहे़ तेव्हा या मतदारांना आपल्या वयाचा पुरावा देऊन वयाची १८ वर्षे पूर्ण व्हायचा दोन महिने आधीच आपले नाव नोंदविता येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले़

आरक्षण वाढणार
सरासरी ५० ते ५५ हजार मतदारांचा एक वॉर्ड असतो़ प्रत्येक वॉर्डाची फेररचना होणार आहे़ अनुसूचित जाती व जमातींच्या व इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे आरक्षित वॉर्डांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़, तरीही वॉर्डांची संख्या २२७ च राहणार आहे़

जनजागृतीसाठी अभिनेते मैदानात
मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे़ या मोहिमेला मराठी अभिनेते अशोक सराफ, प्रशांत दामले आणि स्वप्निल जोशी यांनी प्रतिसाद दिला आहे़ त्यानुसार, मतदार नोंदणीचे संदेश देणाऱ्या पोस्टर्स व जाहितरातींमध्ये हे कलाकार झळकणार आहेत़

लोकसंख्येत चढउतार
- २०१२ मध्ये मुंबईची लोकसंख्या एक कोटी १९ लाख ७८ हजार ४५० लोकसंख्या होती़ यापैकी १ कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ मतदार होते़
- २०१७ मध्ये लोकसंख्येत वाढ होऊन एक कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ झाली आहे, तर मतदार मात्र ९१ लाख ८७ हजार २७८ उरले आहेत़

मतदान केंद्र पहिल्यांदाच वाढणार
२०१२ च्या पालिका निवडणुकीत ७,६३९ मतदान केंद्रे होती़ मतदारांची घटणारी संख्या पाहता, दूरवरच्या मतदान केंद्रावर मतदार फिरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे सर्वांना एक किमीहून कमी अंतरावर मतदान केंद्र उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे़ त्यानुसार, नऊ हजारांहून अधिक मतदान केंद्रे या वेळी असणार आहेत़ मात्र, एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांची मर्यादा घालण्यात येणार आहे़

प्रत्येक निवडणुकीत मतदान ५० टक्क्यांवरच अडकले आहे़ मतदारांची यादी अद्ययावत केली असता, २०१२ नंतर मतदारांच्या संख्येत एक कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ इतकी घट झाली असून, सध्या ९१ लाख ८७ हजार २७८ मतदार उरले आहेत़

अशी होणार मतदारांची नोंदणी
टोल फ्री हेल्पलाइन १८००२२१९५० यावर मतदार नोंदणीविषयी माहिती उपलब्ध आहे़, तर www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार नोंदणी अर्ज व माहिती उपलब्ध आहे, तसेच महाविद्यालयांमध्येही अर्ज वाटण्यात येणार आहेत़ नावात बदल, नावाचा समावेश, मृत मतदाराचे नाव वगळणे, स्थलांतर, नावात दुरुस्ती व नोंदणीसाठी उपनगरांमध्ये २६ केंद्र आहेत़ ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहील़ या सर्वांची माहिती संकेतस्थळावर आहे़

Web Title: Voters fall in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.