जादूटोणा कायद्याची देशपातळीवर दखल
By Admin | Updated: August 12, 2014 01:05 IST2014-08-12T01:05:05+5:302014-08-12T01:05:05+5:30
अंधश्रद्धा, बुवाबाजी, तंत्र-मंत्र, करणी अशा समाज विघातक कृत्यांना गाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. या कायद्याची इतरही राज्यांनी स्तुती केली असून

जादूटोणा कायद्याची देशपातळीवर दखल
विविध राज्यस्तरीय पुरस्कार वितरण : सामाजिक न्यायमंत्र्यांचे प्रतिपादन
अमरावती : अंधश्रद्धा, बुवाबाजी, तंत्र-मंत्र, करणी अशा समाज विघातक कृत्यांना गाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. या कायद्याची इतरही राज्यांनी स्तुती केली असून तो देशपातळीवर लागू करण्याबाबत मंथन सुरू झाल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी अमरावती येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी अमरावतीत फुले, शाहू, आंबेडकर पारितोषिक, संत रविदास पुरस्कार व पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार वितरण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, महापौर वंदना कंगाले, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, आ. श्रीकांत देशपांडे, आ. रावसाहेब शेखावत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी. शिंदे, समाजकल्याण आयुक्त रणजितसिंह देओल, समाजकल्याणचे अतिरिक्त आयुक्त एम.एम. आत्राम, अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, समाजकल्याणचे अवर सचिव वडते आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना मोघे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हातात शिष्यवृत्तीची रक्कम पडावी, यासाठी ई-स्कॉलरशिप सुरू करण्यात आली असून विविध सहा विभागांमध्ये ३२.३६ लाख विद्यार्थ्यांची ई-स्कॉलरशिपसाठी नोंदणी करण्यात आली आहे. यामुुळे शिष्यवृत्ती वाटपात यापूर्वी झालेला घोळ आणि प्राप्त होणाऱ्या तक्रारी बंद होतील.
झोपडपट्टी निर्मूलनासाठी रमाई आवास योजनेंतर्गत २.२५ लाख घरकुल निर्माण करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाची यापूर्वी २७१ वसतिगृहे होती. आता नव्याने १०० वसतिगृहे निर्माण करण्यात आली आहेत. उन्नत गटात न मोडणाऱ्या विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांना ६ लाख रूपयांपर्यंतचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र तीन वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या सहा महामंडळापैकी अपंग विकास महामंडळाची ९१ टक्के वसुली असून ती कौतुकास्पद असल्याचे मोघे म्हणाले. व्यसनमुक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविले जाणारे धोरण हे सामाजिक न्याय विभागाचे मोठे यश आहे.श जादूटोणा विरोधी कायद्याची स्तुती मार्क्सवादी पक्षाचे प्रकाश करात यांनी केली आहे. हा कायदा देशभरात लागू करण्याबाबत केंद्र शासनही विचाराधीन असल्याचे मोघे म्हणाले. संचालन ज्योती आंबेकर, आभार प्रदर्शन आर.डी. शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)