विवेकानंद युवा मित्र योजना जाहीर
By Admin | Updated: January 13, 2015 03:06 IST2015-01-13T03:06:27+5:302015-01-13T03:06:27+5:30
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी आज विवेकानंद युवा/युवती मित्र योजनेची घोषणा केली

विवेकानंद युवा मित्र योजना जाहीर
मुंबई : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी आज विवेकानंद युवा/युवती मित्र योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्णात आणि तालुक्यात एकेक विवेकानंद युवा मित्र नेमण्यात येणार आहे.
हे युवा मित्र त्या-त्या जिल्हा, तालुक्यातील युवक कल्याणाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतील. त्यांच्यासाठी कला, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, व्यसनविरोधी अभियान राबविणे, राज्याच्या युवा धोरणातील विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतील. जिल्हास्तर युवा मित्रास दरमहा पाच हजार रुपये तर तालुकास्तर युवा मित्रास दरमहा तीन हजार रुपये मानधन दिले जाईल. आघाडी सरकारने जाहीर केलेल्या युवा धोरणात असे युवा मित्र नेमण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे तावडे यांनी सांगितले. युवा मित्रांची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने संबंधित जिल्ह्णाचे पालक मंत्री आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.
याशिवाय, स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी राज्यस्तरीय युवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुढील वर्षापासून हे पुरस्कार सुरू होतील, अशी माहिती तावडे यांनी पत्र परिषदेत दिली. (विशेष प्रतिनिधी)