विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात बारा तास
By Admin | Updated: November 4, 2014 02:35 IST2014-11-04T02:35:18+5:302014-11-04T02:35:18+5:30
कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनबारीतून गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना १२ तास लागत आहेत

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात बारा तास
दीपक होमकर, पंढरपूर
कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनबारीतून गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना १२ तास लागत आहेत. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री कडाक्याची थंडी अशा परिस्थितीत भाविक दर्शनबारीत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेत होते.
पंढरपुरात सुमारे तीन लाख भाविक आले आहेत. अनेक भाविक एकादशीची वाट न पाहताच दोन दिवस आधीच दर्शनासाठी रांगेत उभे राहिले होेते. मंदिरामध्ये चपला, मोबाइल, कॅमेरा, पर्स नेण्यास बंदी असल्याने भाविक अनवाणीच रांगेत उभे राहतात; मात्र त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन आणि मंदिर समितीकडून लाकडी बॅरिगेट्स बांधण्यापलीकडे कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याचे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवले.
बारीची सुरुवात ज्या तात्पुरत्या स्वरूपाच्या मांडवापासून होते तेथेच खाली गवत आणि छोटे काटेही असल्याने तेथूनच भक्तांची दिव्य परीक्षेला सुरुवात होते. पहिल्या मंडपातून बाहेर पडायलाच सुमारे तास लागतो तर सगळे पत्राशेड संपवून बाहेर येण्यास तब्बल पाच तास लागत आहेत.
दर्शन मंडपात तब्बल सात मजले चढून परत उतरण्यासाठी तब्बल दोन तास लागतात. अखेर दोन तासांनी रांग विठ्ठल मंदिराच्या छतावर पोहोचल्यावर तेथून अर्धा तासात विठ्ठलाच्या चरणाजवळ भाविक पोहोचतात. केवळ एका सेकंदासाठी चरणाजवळ थांबलेला भाविक पोलिसांकडून गाभाऱ्याबाहेर ढकलला जातो; मात्र त्या सेकंदामध्येच झालेले दर्शन आणि चरणस्पर्श भाविकांचा बारा तासांचा शीण घालवतो.
विठ्ठलाचा मानाचा वारकरी म्हणून पूजा करण्याची संधी मिळावी ही आमची इच्छा होती. ती इच्छा विठ्ठलाने पूर्ण केली. आमच्या जीवनाचे सार्थक झाले, अशी प्रतिक्रिया सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)