विठू पावला चंद्रभागेतीरी तंबूंना मुभा
By Admin | Updated: July 22, 2015 01:57 IST2015-07-22T01:57:14+5:302015-07-22T01:57:14+5:30
नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगत उच्च न्यायालयाने पंढरपूरमध्ये चंद्रभागेतीरी तंबू उभारण्यास मंगळवारी सशर्त परवानगी दिली

विठू पावला चंद्रभागेतीरी तंबूंना मुभा
मुंबई : नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगत उच्च न्यायालयाने पंढरपूरमध्ये चंद्रभागेतीरी तंबू उभारण्यास मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या आषाढीसाठी अपेक्षित असलेल्या सुमारे १४ लाख वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली. चंद्रभागेतीरी तंबू ठोकण्यास न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने बंदी घातली होती. त्यानुसार शासनाने येथून १ किमी अंतरावर ६५ एकर भूखंडावर वारकऱ्यांना तंबू उभारून पूजा करता येईल, अशी व्यवस्था केली. मात्र विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर वाळवंटात पूजा करण्याची प्रथा आहे. आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे तंबू न उभारता पूजा करताना पाऊस आल्यास आमची तारांबळ उडेल. पाऊस पडला नाही तरी तंबूशिवाय भर उन्हात पूजा करणे अशक्य आहे. तेव्हा वाळवंटात तंबू उभारण्यास परवानगी द्यावी असे निवेदन वारकऱ्यांनी सोलापूर व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याची दखल घेत ही बंदी तात्पुरती उठवण्यासाठी राज्य शासनाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. त्यावर आदेश देत न्यायालयाने आधीचा बंदीहुकूम काहीसा शिथिल केला. न्यायालयाने तंबू उभारण्यास मनाई केल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत आहे; आणि ऐनवेळी लाखांच्या संख्येत असलेल्या वारकऱ्यांना रोखणे शक्य नाही. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तसेच ७०० वर्षांची परंपरा तत्काळ थांबवणे शक्य नाही. यासाठी शासन जनजागृती करत आहे व पुढे करेल आणि चंद्रभागेतीरी तंबू लागणार नाहीत, याची काळजी घेईल. त्यामुळे यंदाच्या वर्षी २६ ते २९ जुलैपर्यंत येथे तंबू ठोकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सरकारने अर्जात केली. महत्त्वाचे म्हणजे नदीपात्रात काही खाणार नाही व तेथे घाण करणार नाही, याची हमी आम्ही वारकऱ्यांकडून घेऊ, असेही शासनाने अर्जात नमूद केले.
न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, आषाढी, चैत्री, माघी आणि कार्तिकी या यात्रांसाठी चंद्रभागा नदीच्या पात्रात प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. धार्मिक प्रयोजनार्थ जसे की, भजन, कीर्तन, जागर आणि प्रवचन यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी निश्चित करतील, अशा वर्षातील एकूण २० दिवसांसाठी राहुट्या, तंबू उभारण्यास सवलत दिली आहे. जेणेकरून राज्यातील वारकरी संप्रदायाच्या परंपरा जतन करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)