विठू माझा बहुजनी जाहला; पंढरीत इतिहास घडला!
By Admin | Updated: August 2, 2014 03:20 IST2014-08-02T03:20:29+5:302014-08-02T03:20:29+5:30
एकेकाळी अस्पृश्यांना प्रवेशास मज्जाव असलेल्या पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बहुजन समाजाच्या पुजा-यांनी पूजा करून इतिहास घडवला.

विठू माझा बहुजनी जाहला; पंढरीत इतिहास घडला!
पंढरपूर : एकेकाळी अस्पृश्यांना प्रवेशास मज्जाव असलेल्या पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बहुजन समाजाच्या पुजाऱ्यांनी पूजा करून इतिहास घडवला. विशेष म्हणजे रुक्मिणीमातेचा पोशाख करण्यापासून ते शास्त्रोक्त मंत्रपठण करण्याची जबाबदारी प्रथमच दोन महिला पुजाऱ्यांनी पार पाडली.
सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारी २०१४ रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पातांची मक्तेदारी संपुष्टात आणली होती. त्याबरहुकूम मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या सूचनेनुसार बडवे-उत्पातांना हटवून पूजाविधीसाठी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. शास्त्रोक्त पूजा करण्यास यात पारंगत उमेदवारांची निवड करण्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने पुजाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यासाठी राज्य-परराज्यांतून १९० अर्ज आले होते. यात २३ महिलांचा सहभाग होता, तर प्रत्यक्ष मुलाखतीला चौघींनीच हजेरी लावली आणि त्यातील ऊर्मिला अविनाश भाटे व हेमा नंदकुमार आष्टेकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त दोन महिलांसह १० पुजाऱ्यांनी शुक्रवारी मंदिरात पूजा व विधी सुरू केला. नवनियुक्त पुजाऱ्यांमध्ये नामदेव महाराजांचे सतरावे वंशज केदार कृष्णदास नामदास यांचा समावेश आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उत्साह द्विगुणित झाला असल्याचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले.