भाविकांच्या गर्दीअभावी दर्शन उत्तम; पण दहशतीचे सावट कायम!
By Admin | Updated: July 20, 2016 04:16 IST2016-07-20T04:16:40+5:302016-07-20T04:16:40+5:30
जम्मू ते श्रीनगर बससेवा ठप्प केल्याने अमरनाथ यात्रेत अनेक भाविकांना इच्छा असतानाही सहभागी होता आले नाही.

भाविकांच्या गर्दीअभावी दर्शन उत्तम; पण दहशतीचे सावट कायम!
पंकज पाटील,
अंबरनाथ- काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण असल्याने आणि जम्मू ते श्रीनगर बससेवा ठप्प केल्याने अमरनाथ यात्रेत अनेक भाविकांना इच्छा असतानाही सहभागी होता आले नाही. त्यामुळे बालटाल ते अमरनाथ गुंफा पर्यंतच्या मार्गावर भाविकांची तुरळक गर्दी दिसत होती. एवढेच नव्हे तर मूळ गुंफेपर्यंत गेल्यावर बाबांचे दर्शन घेण्यासाठी जे दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागते तेथे यंदा अवघे १५ ते २० मिनीटे लागत होते.
तणावपूर्ण वातावरणातून वाट काढत जो भाविक गुंफेपर्यंत पोहचला त्या भाविकाला कधी नव्हे एवढे चांगले दर्शन घेण्याचा आनंद मिळाला. मात्र त्यानंतर तब्बल तीन-चार दिवस भाविकांना बालटालमध्येच अडकून पडावे लागले.
श्रीनगर ते बालटाल आणि श्रीनगर ते पेहलगामपर्यंत भाविकांना पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. जीव मुठीत घेऊन अनेक भाविक हे बालटाल आणि पेहलगामपर्यंत आले. मात्र पुढे दर्शनासाठीचा खडतड प्रवास कसा करावा हा भाविकांपुढे मोठा प्रश्न होता. जे भाविक बालटालपर्यंत पोहचले त्या भाविकांपैकी शेकडो भाविकांना दोन दिवस बालटालमध्ये अडकून पडावे लागले. दोन दिवस यात्रा बंद असल्याने हजारो भाविकांची यात्रा सुरु झाल्यावर गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र यात्रेच्या ठिकाणापर्यंत पोहचणेच शक्य न झाल्याने अडकलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय यात्रा समितीने घेतला. त्यानुसार यात्रा सुरु झाल्यावर लागलीच सकाळी ६ वाजता भाविकांचा कारवाँ अमरनाथ बाबांच्या गुंफेच्या दिशेने निघाला. बालटाल ते बाबांची गुफा हे १२ कि.मी.चे अंतर कापण्यासाठी सर्वसाधारण ६ तास लागतात. मात्र यात्रेत भाविकांची संख्या कमी असल्याने आणि रस्ते मोकळे असल्याने हे अंतर भाविकांनी सहज ४ तासांतच कापले. बालटाल ते गुंफेपर्यंतचा रस्ता हा अत्यंत अवघड आणि वळणाचा आहे. दोन ते तीन हजार फूट खोल दरीच्या कडेकडेने चालताना भाविक ‘जयभोले’चा जयघोष करीत हा धोकादायक वळणावळणाचा रस्ता सहज पार करीत होते. ज्या भाविकांना हा धोकादायक प्रवास करणे शक्य होत नाही अशा भाविकांना बालटाल पासून हेलिकॉप्टरने पंचतरणीपर्यंत पोहचण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र पंचतणीपासून पुन्हा गुंफेपर्यंत जाण्यासाठी सहा कि.मी.चे अंतर हे अवघड वळणातूनच कापावे लागतेच. थंड वातावरणामुळे येथील दगडी पायऱ्या देखील बर्फाच्या लादीप्रमाणे थंड झालेल्या असतात. त्यामुळे बर्फाच्या लादीवरुन चालत असल्याचा अनुभव भाविकांना येतो. अनेक यात्रेकरुन पोहचू न शकल्याने बाबांच्या गुंफेत भाविकांना थांबून दर्शन घेता येत होते. गर्दी नसल्याने येथील सुरक्षा रक्षक देखील भाविकांना रेंगाळले तरी अडवत नव्हते. ज्या ठिकाणी भाविकांना अर्धा मिनीट देखील थांबविले जात नाही त्या ठिकाणी भाविक ३ ते ५ मिनीट थांबून बाबांचे दर्शन घेत होते. चांगले दर्शन मिळाल्याने तेथे पोहोचलेले मोजकेच भाविक आनंदात परतीचा प्रवासासाठी खाली उतरले. जे भाविक घोड्यावरुन आले त्यांनी घोड्यावरुन पुन्हा खाली येण्याचा मार्ग पकडला. मात्र ज्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास केला होता त्यांच्या वाट्याला निराशाच आली. हेलिकॉप्टर सेवा इंधनाअभावी बंद झाल्याने भाविकांना आता घोड्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. जीव मुठीत धरून अनेक भाविकांनी हा अवघड मार्गावरुन उतरण्याचा निर्णय घेतला.
>काश्मिरातील बिघडलेल्या परिस्थितीचे सावट यंदाच्या अमरनाथ यात्रेवर पडले. यात्रा काही काळ स्थगितही झाली. अडकलेले पर्यटक, यात्रेकरूंचे हाल झाले. या यात्रेत सहभागी झालेल्या ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने या प्रवासातील नोंदवलेली निरीक्षणे.दर्शन झाल्याचे समाधान असले तरी आपल्या नियोजित स्थळी पोहचण्यासाठी पुन्हा कसरत करावी लागली. बालटालमधून बाहेर पडण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान गाड्या बाहेर सोडत नसल्याचे कळताच आता आपण अडकलो, अशी बहुतांश भाविकांमध्ये भावना निर्माण झाली. दोन ते तीन दिवसांपासून शेकडो यात्रेकरु या बालटालमध्ये अडकून पडले होते. त्यांच्या गाड्या श्रीनगरपर्यंत सोडण्यात येत नव्हत्या. रात्री १० वाजता गाड्या सोडणार, अशी अपेक्षा असताना सरकारने बालटालहून गाड्या न सोडता श्रीनगरहून भाविकांना बालटालर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरुन दोन्ही बाजुला वाहतूक सुरु झाल्यास वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि या कोंडीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने सरकारने एका बाजूनेच वाहतूक सुरु केली. अखेर चार दिवसांनंतर परतीचा प्रवास सुरू झाला.