मुंबईच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर
By Admin | Updated: March 8, 2017 19:51 IST2017-03-08T17:46:11+5:302017-03-08T19:51:41+5:30
शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी विराजमान झाले असून, हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड झालीय

मुंबईच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - मुंबई महापालिकेवर शिवसेनेने पुन्हा भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी विराजमान झाले असून, हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड झालीय. विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे 76व्या महापौर ठरले आहेत. हेमांगी वरळीकर शिवसेनेच्या पहिल्या उपमहापौर ठरल्या आहेत. महाडेश्वर यांच्या बाजूनं शिवसेना 84, भाजपा 83 आणि अपक्ष 4 अशा एकूण 171 नगरसेवकांनी मतदान केलं आहे. अपक्ष उमेदवार मुमताझ खान यांनी सेनेला पाठिंबा दिला नाही. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना 31 मते मिळाली आहेत.
महापौरपदाच्या निवडणुकीच्या मतदानावेळी सपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने हात वर केले नाहीत. मनसेच्या नगरसेवकांनी यावेळी अनुपस्थित राहणं पसंत केलं आहे. पक्षाकडून निरोप न आल्याने नगरसेवक आपापल्या कार्यालयातच बसून होते. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही, याबाबत पक्ष प्रमुखांकडून स्पष्ट सूचना न मिळाल्यानं मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात येणे टाळले.
शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांनी ढोल-ताशे वाजवून वाजतगाजत मिरवणुका काढल्या आहेत. त्यामुळे शिवसेना मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वरळी सी-लिंकवरून यांची एक रॅली निघणार आहे. उद्धव ठाकरे या रॅली मुंबईकरांचे आभार मानतील. तसेच हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्त्यांना अभिवादन करणार आहेत.