विष्णू वाघ यांची प्रकृती ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 19:12 IST2016-08-20T19:12:10+5:302016-08-20T19:12:10+5:30
गोव्याचे आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती स्थिर आहे.

विष्णू वाघ यांची प्रकृती ‘जैसे थे’
>मुंबई: गोव्याचे आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती ‘जैसे थे’ अशीच आहे. वाघ यांना गुरुवारी रात्री माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे विशेष पथक उपचार करीत आहे. पण, अजूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाघ यांच्यावर गोव्यामधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. पण, त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. वाघ यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. जास्त दगदग झाल्यामुळे वाघ यांचा उच्च रक्तदाब वाढला होता. उच्च रक्तदाब वाढल्याने त्यांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाघ यांची प्रकृती नाजूक होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण, थोडेच दिवसांत वाघ यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. जुलै महिन्यांत त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे झालेल्या दगदगीमुळे आॅगस्टच्या दुसºया आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. वाघ यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढली होती.
हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. औषधोपचारांना काही प्रमाणात ते प्रतिसाद देत असल्यामुळे प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)