हज यात्रेकरूंना व्हिसाची चिंता

By Admin | Updated: July 13, 2016 04:03 IST2016-07-13T04:03:35+5:302016-07-13T04:03:35+5:30

मुस्लीम धर्मियांमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी भारतातून रवाना होणाऱ्या सव्वा लाखांवर भाविकांच्या यात्रेला जेमतेम तीन आठवडे शिल्लक असताना अनिश्चिततेची टांगती तलवार आहे

Visas concern for Haj pilgrims | हज यात्रेकरूंना व्हिसाची चिंता

हज यात्रेकरूंना व्हिसाची चिंता

जमीर काझी,  मुंबई
मुस्लीम धर्मियांमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी भारतातून रवाना होणाऱ्या सव्वा लाखांवर भाविकांच्या यात्रेला जेमतेम तीन आठवडे शिल्लक असताना अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. हज कमिटी इंडियामार्फत जाणाऱ्या एक लाख २० भाविकांचे व्हिसा अद्याप सौदी अरेबियाकडून मिळालेले
नाहीत, तर खासगी टुर्स कंपनीमार्फतच्या ३६ हजार जागांच्या कोट्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
सौदी सरकारने या वर्षी नव्याने बनविलेल्या व्यवस्थेतील तांत्रिक कारणांमुळे हा विलंब होत असल्याचे हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे हजच्या तयारीत असलेल्या भाविकांमध्ये अस्वस्थता आहे. या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हजचा मुख्य विधी होत आहे. त्यासाठी भारतातून ४ आॅगस्टपासून पाच सप्टेंबरपर्यंत विविध विमानतळांवरून भाविकांना पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, व्हिसा मुदतीत न मिळाल्यास भारतीय यात्रेकरूंचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
इस्लाममधील पाच प्रमुख तत्त्वांपैकी हज यात्रा हे एक महत्त्वाचे तत्त्व असून, भारतातून त्यामध्ये सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया परराष्ट्र मंत्रालयामार्फत पार पाडली जाते. या वर्षी हज कमिटीमार्फत जाण्यासाठी चार लाखांवर इच्छुक होते. त्यांच्यात सोडत काढून १ लाख २० जणांची निवड करण्यात आली. गेल्या फेबु्रवारीपासून सुरू झालेल्या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या सर्व राज्यांतील यात्रेकरुंनी त्यासाठी पासपोर्ट, आवश्यक कागदपत्रे व प्रवासासाठीचे शुल्क जमा केले आहे. मात्र, अद्याप व्हिसाचे वितरण सौदी सरकारकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे इच्छुक हवालदिल झाले असून, ते राज्य व केंद्रीय हज समितीच्या कार्यालयाशी वारंवार संपर्क साधत आहेत.
मात्र, तुमचा व्हिसा लवकरच मिळेल, असे आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. त्याचप्रमाणे, खासगी टुर्स कंपनीतर्फे ३६ हजार जणांना पाठविण्याचे नियोजन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. मात्र, त्यालाही अद्याप सौदी सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. प्रायव्हेट कंपन्यांनी त्यासाठी प्रत्येक यात्रेकरूंकडून सरासरी अडीच ते तीन लाख रुपये घेतलेले आहेत.
 

 

Web Title: Visas concern for Haj pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.