शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरूम ‘इंटरनेट’शी जोडणार

By Admin | Updated: April 28, 2017 02:49 IST2017-04-28T02:49:10+5:302017-04-28T02:49:10+5:30

महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये उपग्रह आधारित ‘व्हर्च्युअल क्लासरूम’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनदेखील शिक्षण दिले जात आहे.

The virtual classrooms in the schools will connect to the Internet | शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरूम ‘इंटरनेट’शी जोडणार

शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरूम ‘इंटरनेट’शी जोडणार

मुंबई : महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये उपग्रह आधारित ‘व्हर्च्युअल क्लासरूम’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनदेखील शिक्षण दिले जात आहे. मात्र आता इंटरनेट तंत्रज्ञानातील सुधारणा व इंटरनेटचा वाढलेला वेग लक्षात घेऊन ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ उपग्रहाऐवजी इंटरनेट आधारित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ प्रक्षेपण अधिक वेगवान व तुलनेने अधिक चांगल्या दर्जाचे होणार आहे. विशेष म्हणजे ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ इंटरनेट आधारित केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना व्याख्याने घरबसल्या पाहणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर येत्या वर्षात २०२ शाळांमध्ये नव्याने सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ संलग्न असणाऱ्या शाळांची संख्या ६८२ एवढी होणार आहे.
‘व्हर्च्युअल क्लासरूम’साठी वर्ष २०१७ - १८च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २१ कोटी ८४ लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण खात्याचे उपायुक्त मिलीन सावंत यांनी दिली आहे. उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारे ‘व्हर्च्युअल क्लासरूम’करिता प्रक्षेपण करण्याच्या काही मर्यादा आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या आवाजाची व चित्राची गुणवत्ता आणि प्रक्षेपण कालावधीसाठी लागणारा वेळ यांचा समावेश आहे. वर्ष २०११च्या तुलनेत आता इंटरनेट तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणा व इंटरनेटचा वाढलेला वेग लक्षात घेता ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ शिक्षण पद्धती ही उपग्रहाऐवजी इंटरनेट तंत्रज्ञान आधारित करण्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. उपग्रह तंत्रज्ञानाच्या तुलनेत इंटरनेट आधारित प्रक्षेपणामध्ये आवाज व चित्राची गुणवत्ता अधिक चांगल्या दर्जाची आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरण व उपग्रहाद्वारे ‘व्हर्च्युअल क्लासरूम’मध्ये दिसणारे प्रक्षेपण; तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर ते चित्रीकरण स्टुडिओपर्यंत उपग्रहामार्फत पोहचणे या प्रक्षेपण प्रवासात अनेकदा काही प्रमाणात कालापव्यय होतो, इंटरनेटमुळे ते टाळता येईल. तसेच तुलनेने अधिक वेगवान व तत्काळ प्रक्षेपण होत असल्याने विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारण्यासाठी तुलनेने अधिक वेळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The virtual classrooms in the schools will connect to the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.