कौमार्य सिद्ध न झाल्याने वधूला माहेरी पाठविले!
By Admin | Updated: June 2, 2016 02:38 IST2016-06-02T02:38:56+5:302016-06-02T02:38:56+5:30
लग्नानंतर जातपंचायतीने घेतलेल्या कौमार्याच्या कथित चाचणीत नववधू दोषी आढळली, असा ठपका ठेवत जातपंचायतीने लग्न रद्द ठरविल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील

कौमार्य सिद्ध न झाल्याने वधूला माहेरी पाठविले!
संगमनेर/नाशिक : लग्नानंतर जातपंचायतीने घेतलेल्या कौमार्याच्या कथित चाचणीत नववधू दोषी आढळली, असा ठपका ठेवत जातपंचायतीने लग्न रद्द ठरविल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील (अहमदनगर) घुलेवाडी येथील वधूबाबत घडला. मात्र ‘अंनिस’चा पाठपुरावा व प्रसारमाध्यमांच्या दणक्यामुळे बुधवारी वधूचा स्वीकार करत तिचा पती व सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदण्यासाठी नेले.
घुलेवाडीतील एका तरुणीचा २२ मे रोजी नाशिकच्या तरुणाशी विवाह झाला. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी वधूच्या माहेरीच जात पंचायतीने तिच्या कौमार्याची कथित चाचणी घेतली. त्यात वराने व जातपंचायतीने तिला दोषी ठरवत तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. लग्न रद्द ठरवून वधूला माहेरीच सोडून वऱ्हाडी परतले. मुलाच्या कुटुंबीयांनी वधूच्या अंगावरील सोनेही काढून घेतले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जिल्हा कार्याध्यक्षा अॅड. रंजना गवांदे यांना हे प्रकरण समजले. त्यांनी तातडीने नववधूची भेट घेवून हा प्रश्न जात पंचायत विरोधी समितीचे कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने ऐरणीवर आणला. या विषयीचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येताच जात पंचायतीवर टीकेची झोड उठली.
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने पोलीस उपमहानिरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व अॅड. गवांदे यांनी विवाहितेच्या घरी भेट देऊन वास्तव जाणून घेतले. पोलिसांनी तिला धीर देत नवरदेवाशी संपर्क साधून त्याला संगमनेरला बोलाविले. त्यानुसार पाच वाजता नवरदेव घुलेवाडीत आला. विवाहितेच्या घरात नातेवाईकांची बैठक होऊन त्याने गैरसमजातून झालेल्या घटनेची माफी मागत पत्नीस नांदायला नेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. अखेर पोलीस बंदोबस्तात नववधू सासरी रवाना झाली. (प्रतिनिधी)
च्लग्नानंतर पंचांनी एक पांढरेशुभ्र वस्त्र नवदाम्पत्याला देऊन मंडपाशेजारच्या खोलीत जाण्यास सांगितले. काही वेळेनंतर जात पंचायत बसली. पंचांनी विचारणा केल्यावर नवऱ्या मुलाने सर्वांसक्षम आत घडलेल्या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केले. पंचांनी एक धक्कादायक प्रश्न विचारला, ‘माल खरा निघाला की खोटा?’ त्यावर नवऱ्या मुलाने हातातील पांढरे वस्त्र पंचांकडे दिले. पंचांनी ते बघितले. त्यावर रक्ताचा डाग नव्हता. तेवढ्यातच मुलाने ‘माल खोटा..खोटा.. खोटा’ असे म्हटले. या वाक्याने सगळीकडे शांतता पसरली. वधूपित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने आक्रोश करून मी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असल्याने असे घडले असेल, असे जीव तोडून सांगितले. वडिलांनीदेखील सगळ्यांना विनवणी केली. मात्र पंचांनी हेका सोडला नाही.
घडलेल्या प्रकरणाबाबत वधू आणि वर पक्षात आपसात समझोता झालेला आहे. त्यांची या प्रकरणाविषयी कुठलीही तक्रार नाही. दोघांचे तसे जबाब पोलीस डायरीला नोंदवून घेतले आहेत.
- गोविंद ओमासे, पोलीस निरीक्षकवधू-वर पक्षातील लोकांची बैठक झाली. आपणावरील दबावामुळे हा प्रकार घडल्याचे नवऱ्या मुलाने सांगितले. वधूला नांदविण्यास सासरची मंडळी तयार असल्याने आपसातील चर्चेतून हे प्रकरण तडीस लागले आहे. जातपंचायतींनी अशा अघोऱ्या व अशास्त्रीय प्रथा थांबविण्याची गरज आहे.
- अॅड. रंजना गवांदे, कार्याध्यक्षा अंनिस