वीरेंद्र तावडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By Admin | Updated: October 26, 2016 17:12 IST2016-10-26T17:08:43+5:302016-10-26T17:12:26+5:30
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडी ८ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

वीरेंद्र तावडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 26 - ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. तावडे याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर १६ नोव्हेंबरला अंतिम निर्णय दिला जाईल, असे न्यायाधीश पाटील यांनी स्पष्ट केले.
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याला पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीच्या चौकशीमध्ये महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. वीरेंद्र तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली. न्यायालयाने त्याच्या कोठडीमध्ये पुन्हा चौदा दिवसांची वाढ केली.
दरम्यान, डॉ. तावडे ‘एसआयटी’च्या ताब्यात असताना अॅड. समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांना त्याची भेट घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती; परंतु पोलिसांनी या दोघांनाही भेट नाकारल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये ४ सप्टेंबरला तावडे याला तपासासाठी पनवेलला घेऊन गेलो होतो, त्यामुळे वकिलांना भेट देता आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी मांडला. त्यावर अॅड. पटवर्धन यांनी पोलिस तावडे याला रात्री घेऊन गेले होते. आम्ही सकाळी पोलिस ठाण्यात गेलो होतो तरीही आमची भेट दिली नाही. प्रसारमाध्यमांना फोटो काढण्यापासून पोलिसांनी रोखलेले नाही. त्याच्या सुरक्षेचा कोणतीही खरबदारी पोलिसांनी घेतली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश पाटील यांनी १६ नोव्हेंबरला निकाल दिला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)