मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडेचा संबंध कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी आहे की नाही, हे तपासण्यासाठी सीआयडी लवकरच वीरेंद्र तावडेचा ताबा घेणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने सीआयडीच्या याचिकेवरील सुनावणी ११ आॅगस्टपर्यंत तहकूब केल्याने समीर गायकवाडच्या खटल्यावर दिलेली अंतरिम स्थगितीही तोपर्यंत कायम करण्यात आली आहे. पानसरे हत्येप्रकरणी सीआयडीने सनातन संस्थेच्या समीर गायकवाडला अटक केली आहे. त्याच्या केसमध्ये असलेला सर्व मुद्देमाल सीबीआयने स्कॉटलंड यार्ड येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व कर्नाटकचे ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचाच हात असावा, असा दाट संशय सीबीआय व सीआयडीला आहे. याच संशयाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणावरून जप्त केलेल्या रिकाम्या पुंगळ्या, रिव्हॉल्व्हर आणि अन्य वस्तू स्कॉटलंड यार्डला पाठवल्या आहेत.स्कॉटलंड यार्ड जोपर्यंत अहवाल सादर करून मुद्देमाल परत करत नाही, तोपर्यंत खटल्याला स्थगिती द्यावी, याकरिता सीआयडीने कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने सीआयडीचा अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीआयडीने उच्च न्यायालयात अर्ज केला. सोमवारी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या अर्जावर सुनावणी होती.दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी या तिन्ही हत्यांशी तावडेचा काही संबंध आहे का? याबद्दल सीआयडीला तपास करायचा आहे. त्यासाठी सीआयडी लवकरच तावडेचा ताबा घेणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्या. जाधव यांना दिली.‘स्कॉटलंड यार्डकडून किती कालावधीत फॉरेन्सिक रिपोर्ट घेण्यात येणार आहे, याबद्दल सीबीआय व सीआयडी काहीही स्पष्ट करत नाहीये आणि या कारणासाठी खटल्याला का स्थगिती द्यावी? घटनास्थळावरून जप्त केलेल्या रिकाम्या पुंगळ्या , काडतूस यांच्याशी काहीही संबंध नसलेले ४० साक्षीदार आहेत. त्यांची साक्ष नोंदवली जाऊ शकते,’ असा युक्तिवाद अॅड. पुनाळेकर यांनी केला. (प्रतिनिधी) साक्षीदारांची साक्ष नोंदवा - पुनाळेकरगायकवाडचे वकील संजीव पुनाळेकर यांनी सरकारी वकिलांच्या युक्तिवादावर आक्षेप घेतला. आतापर्यंत या तिन्ही हत्यांचा एकमेकांशी संबंध असल्यासंदर्भात एकही पुरावा रोकॉर्डवर आणण्यात आला नाही, असे अॅड. पुनाळेकर यांनी सांगितले. ४० साक्षीदार आहेत. त्यांची साक्ष नोंदवली जाऊ शकते, असा युक्तिवाद केला.
वीरेंद्र तावडेचा ताबा घेणार
By admin | Updated: July 26, 2016 01:19 IST