दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराचा पाठलाग करून त्याला मारहाण करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एवढेच नाही तर, या महिलेने मदत मिळेपर्यंत त्याला जाऊ दिले नाही. या धाडसी कृत्यामुळे महिलेचे कौतुक होत आहे. हा संपूर्ण प्रकार नाशिकच्या जय भवानी रोडवर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्यावर उभी असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून मोटारसायकवरून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, या महिलेने न घाबरता चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. या महिलेने चोरट्याकडून केवळ मंगळसूत्र परत मिळवले नाही तर, मदत मिळेपर्यंत त्याला जाऊ दिले नाही.
याप्रकरणी स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि जलदगतीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले, असे वृत्त आजतकने दिले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोक महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.