लाचखोर माळींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’!

By Admin | Updated: June 11, 2014 01:41 IST2014-06-11T01:41:23+5:302014-06-11T01:41:23+5:30

मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक

'VIP treatment' to the graft gardener! | लाचखोर माळींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’!

लाचखोर माळींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’!

सुमेध वाघमारे - नागपूर
मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. मात्र त्याचवेळी धडधाकट असलेल्या आरोपींना वातानुकूलित अतिदक्षता विभागात ठेवून अगदी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जाते. हा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला. लाच घेताना अटक केलेल्या अरुण माळी यांच्यावर विशेष उपचार सोमवारच्या रात्रीपासून सुरू आहे.
औषध वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचा अंतर्गत वॉर्ड क्र. २४ हा अतिदक्षता विभाग येतो. २४ खाटांच्या या विभागात सुमारे १८ रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते तर विशेष सहा रुग्णांना वातानुकूलित विभागात ठेवले जाते. अतिदक्षता विभागात सर्जरी व इतरही विभागाच्या गंभीर रुग्णांनाही ठेवले जाते. यामुळे मेडिकलमधील हा विभाग सर्वात व्यस्त आहे. अनेक वेळा या विभागात गंभीर रुग्णांनाही खाट मिळत नाही.
माळी आजारी आहेत ?
सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना रविवारी अडीच लाख रु पयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली. सोमवारी त्याला पोलीस कोठडी मिळाली. रात्री ११.३० वाजता छातीत दुखते आणि घबराहट होते म्हणून त्याला याच विभागात आणले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रात्रीच एका हृदयतज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला तपासले. ईसीजी काढला. परंतु त्यात हृदयाशी संबंधित बदल दिसले नाही. तसा अहवालही दिला. सामान्यत: त्याचवेळी लगेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या संबंधित डॉक्टरने त्याला पोलिसांच्या हवाली किंवा सामान्य वॉर्डात हलवायला हवे होते. परंतु त्याला वातानुकूलित असलेल्या अतिदक्षता विभागातच ठवले. आज सकाळपासून माळी आपल्या मोबाईलमध्ये गाणी ऐकत होते, गेम खेळत होते, मोबाईलवरून दुसऱ्याशी संवाद साधत होता. याची कोणीच दखलही घेतली नाही.
सर्वात गंभीर बाब म्हणजे त्याला ना सलाईन लावलेले होते ना इतर कुठले औषध. तरीही आज सकाळपासून त्याला काय पाहिजे-नको त्याची गंभीरपणे खबरबात घेणे सुरू होते. मात्र त्याचवेळी भरती असलेल्या इतर रुग्णांकडे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येत होते. त्या सामान्य रुग्णांना विविध मशीन लावून आपली जबाबदारी संपली असे वागताना काही डॉक्टर दिसून येत होते. त्यांची शुश्रुषा करण्यासाठी त्यांचे नातेवाईकच धावपळ करीत होते. ही माणुसकीची शोकांतिका आहे, असे येथील रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 'VIP treatment' to the graft gardener!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.