दादरमध्ये मोर्चाला हिंसक वळण
By Admin | Updated: June 29, 2016 05:09 IST2016-06-29T05:09:00+5:302016-06-29T05:09:00+5:30
दादरच्या आंबेडकर भवनपासून भोईवाडा पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण

दादरमध्ये मोर्चाला हिंसक वळण
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी स्थापन केलेले दादरचे आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची वास्तू शनिवारी जमीनदोस्त करण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी दादरच्या आंबेडकर भवनपासून भोईवाडा पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून जमावाने परिसरातील दुकानांची व रस्त्यावरील वाहनांची मोडतोड केल्याने दादर-माटुंगा-परळ परिसरात बाजारपेठ बंद
झाली.
आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची वास्तू शनिवारी संस्थेच्या विश्वस्तांनी जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी दादरच्या आंबेडकर भवनपासून भोईवाडा पोलीस ठाण्यावर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्यास मोठा जमाव गोळा झाला.
आंबेडकर भवनपासून निघून पूर्वेकडील बाजारपेठेच्या भागात आल्यावर मोर्चातील जमाव हिंसक झाला. (प्रतिनिधी)
>अनेकांच्या हातात सळ्या, काठ्या होत्या. त्यांनी परिसरातील दुकानांची तोडफोड सुरू केली; तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या कारच्या काचाही फोडल्या. या हिंसाचारामुळे बाजारपेठ बंद झालीच; शिवाय मोठी वाहतूककोंडी झाली. थेट शीवपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
>याविषयी, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रमुख काशिनाथ निकाळजे यांनी सांगितले की, आंबेडकर भवनचे पाडकाम करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा, त्यांना अटक करा अशी मागणी आहे. याविषयी भोईवाडा पोलिसांनी एक-दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कारवाई न झाल्यास राज्यव्यापी बंद पुकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
>‘बाबासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही!’
यानंतर रत्नाकर गायकवाड यांनी आंदोलकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. आंबेडकर भवनच्या पुनर्विकासाला आंबेडकर बंधू केवळ पैशांसाठी विरोध करत असल्याचा आरोप करत बाबासाहेब कुणा एका व्यक्ती किंवा कुटुंबाची मक्तेदारी नाही. ते सर्व देशाचे आहेत. त्यामुळे आंबेडकर भवनवर दावा करणाऱ्यांनी देशाच्या ‘घटने’चे पेटंट घेतले नाही हे नशीब म्हणावे लागेल, अशा शब्दांत गायकवाड यांनी आंबेडकर बंधूंवर टीका केली.
आंबेडकर भवनची इमारत पाडल्यानंतर पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टवर विविध आरोप होऊ लागले. त्याचा खुलासा गायकवाड यांनी केला. ते म्हणाले की, इमारत पाडण्यावरून चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात आहे. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा भूखंड लोकवर्गणीतून विकत घेतला होता. त्या जागी अस्पृश्य समाजाचे एक सामाजिक केंद्र उभारण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचे प्रयत्न ट्रस्ट करत आहे. मात्र या जागी गुंडाचा अड्डा उभारलेल्या आंबेडकर बंधूंना पैसा कमवायचा आहे. त्यासाठीच भावनिक मुद्दा उपस्थित करून ते आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी बाबासाहेबांनी नियोजलेल्या सामाजिक केंद्राची निर्मिती करणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
>गेल्या २५ वर्षांपासून मी आंबेडकरी चळवळीत काम करत आहे. आंबेडकर भवनामध्ये माझे आयुष्य गेले. नि:स्वार्थी भावनेने काम करणारे आंबेडकर कुटुंबीय आज राजकारणात मागे आहेत. त्यामुळे रत्नाकर गायकवाड यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. शिवाय दादरमध्ये दुकानांवर झालेले हल्ले हा कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होता. बाबासाहेबांची प्रेस तोडल्यानंतर कोणताही कार्यकर्ता शांत राहू शकत नाही.
- आनंदराज आंबेडकर, अध्यक्ष, रिपब्लिकन सेना
>जागेशी प्रेसचा संबंध नाही!
१९६६ साली नायगावमध्ये झालेल्या दंगलीत बाबासाहेबांच्या प्रेसचे नुकसान झाले होते. त्यामुळे भाडेतत्त्वावर त्यांनी ही प्रेस आंबेडकर भवनमध्ये हलवली होती. मात्र प्रेसचे भाडे बाबासाहेब ट्रस्टजवळ जमा करत होते. त्यामुळे जागेच्या मालकी हक्कावर प्रेसचा कोणताही हक्क नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शिवाय ही प्रेस हेरीटेज वास्तूमध्ये नसल्याचा खुलासाही गायकवाड यांनी केला आहे.
>विकासकामाला विरोध नको
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टद्वारे दादरसारख्या मध्यवर्ती भागात १७ मजली आंबेडकर भवनची वास्तू उभारण्यात येणार असेल, तर या कामाला कुणीही विरोध करू नये. समाजाच्या उत्थानासाठी होत असलेल्या विकासकामात वाद नको. आंबेडकर भवनमध्ये सध्या असलेल्या जागेच्या दुप्पट जागा आंबेडकर कुटुंबीयांना देऊन ट्रस्टने वाद मिटवावा.
- खा. रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष - रिपब्लिकन पार्टी आॅप इंडिया(ए)
>नातेवाइकांना ट्रस्टवर ‘नो एन्ट्री’
बाबासाहेबांनी स्वत:च्या मुलाला ट्रस्टवर घेण्यास नकार दिला होता. त्यामुळेच आत्तापर्यंत आंबेडकर कुटुंबातील एकाही व्यक्तीला ट्रस्टवर घेण्याचे विश्वस्तांंनी टाळले, असा दावा गायकवाड यांनी केला आहे. यापुढेही आंबेडकर बंधूंना ट्रस्टवर घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.