कुलगुरू, कुलसचिवांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 22, 2014 05:15 IST2014-05-22T05:15:49+5:302014-05-22T05:15:49+5:30
कुलगुरू मोहन खेडकर यांनी स्वग्राम प्रवास भत्त्यासाठी ३० आॅगस्ट २०११ रोजी ७५ हजारांची उचल केली होती. यासाठी खेडकर यांना विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी मदत केली.

कुलगुरू, कुलसचिवांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमरावती : स्वग्राम प्रवास भत्त्यासाठी पात्र नसतानादेखील प्रवासी भत्ता काढून अमरावती विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक फ्रेजरपुरा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मोहन कृष्णराव खेडकर व कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांच्याविरुद्ध बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सुमारे दोन महिन्यांपासून कुलगुरू खेडकर हे सक्तीच्या रजेवर आहेत. हे प्रकरण संपत नाही तोच याप्रकरणामुळे कुलगुरू व कुलसचिव चांगलेच अडचणीत आले आहेत. कुलगुरू मोहन खेडकर यांनी स्वग्राम प्रवास भत्त्यासाठी ३० आॅगस्ट २०११ रोजी ७५ हजारांची उचल केली होती. यासाठी खेडकर यांना विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी मदत केली. यासंदर्भात विद्यापीठात कार्यरत तत्कालीन प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी १६ मे २०१३ मध्ये याबाबत राजेंद्र प्रसाद यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी हे प्रकरण चौकशीकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले. त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेद्वारे राज्यपालांना पाठविण्यात आला. राज्यपालांच्या आदेशनान्वये त्यानंतर कुलगुरू व कुलसचिवांना दीर्घ रजेवर पाठविण्यात आले. परंतु पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. शेवटी राजेंद्र प्रसाद यांनी सीआरपीसी १५६/३ च्या अंतर्गत न्यायालयात अर्ज करून गुन्हे नोंदविण्याची मागणी केली. त्या आधारावर न्यायालयाने १६ मे २०१४ रोजी कुलगुरू-कुलसचिवांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे आदेश फ्रेजरपुरा पोलिसांना दिले. न्यायालयाच्या आदेशान्वये फ्रेजरपुरा पोलिसांनी कुलगुरू खेडकर व कुलसचिव जोशी या दोघांविरुद्ध विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान स्वग्राम प्रवास भत्त्याची उचल केलेली रक्कम कुलगुरुंनी विद्यापीठात जमा केली होती. कुलगुरु आणि कुलसचिवांविरुद्ध विद्यापीठस्तरावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान एनएसयूआयने कुलगुरू व कुलसचिवांविरुद्ध कुलगुरू कन्येच्या गुणवाढीचे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. या प्रकरणात आंदोलन केल्यानंतर राज्यपालांच्या दालनात हे प्रकरण पोहोचले. (प्रतिनिधी)