बँकेचे कर्ज थकवल्याने विनोद कांबळी अडचणीत
By Admin | Updated: July 12, 2014 14:34 IST2014-07-12T14:34:06+5:302014-07-12T14:34:23+5:30
बँकेचे कर्ज थकवल्याने माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे.

बँकेचे कर्ज थकवल्याने विनोद कांबळी अडचणीत
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १२ - बँकेचे कर्ज थकवल्याने माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. विनोदने डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे (डीएनएसबी) कर्ज थकवले असून बँकेने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. त्याची मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे.
याप्रकरणी डीएनएसबी बँकेने आजच्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली असून त्यात कर्जदार म्हणून विनोद कांबळी व त्याची पत्नी अँड्रिया या दोघांचाही फोटो छापण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वांद्र्यातील घराचा पत्ताही देण्यात आला आहे.
'विनोद गणपत कांबळी (कर्जदार) व अँड्रिया विनोद कांबळी (सहकर्जदार) यांना वितरित करण्यात आलेले कर्जाची वेळोवेळी मागणी करूनही परतफेड करण्यात आलेली नाही. बँकेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तरी वरील व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात कोणालाही माहिती असल्यास बँक व्यवस्थापनास कळवावे', असे या जाहिरातीत म्हटले आहे.
बँकेच्या या भूमिकेवर विनोद काय प्रतिक्रिया देतो हे आता पहायचे आहे.