विनोद कांबळीने बँकेचे कर्ज थकविले
By Admin | Updated: July 14, 2014 03:46 IST2014-07-14T03:46:04+5:302014-07-14T03:46:04+5:30
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आता पुन्हा एकदा नव्या वादात सापडला असून, त्याने ५0 लाखांचे कर्ज थकवल्याबाबत डोंबिवली नागरी सहकारी बँकेने त्याच्याविरोधात जाहिरातीद्वारे नोटीस बजावली आहे.

विनोद कांबळीने बँकेचे कर्ज थकविले
मुंंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आता पुन्हा एकदा नव्या वादात सापडला असून, त्याने ५0 लाखांचे कर्ज थकवल्याबाबत डोंबिवली नागरी सहकारी बँकेने त्याच्याविरोधात जाहिरातीद्वारे नोटीस बजावली आहे.
कांबळीने डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या दादर शाखेकडून २००९ आणि २०१० साली वाहन, गृहखरेदीसाठी ५० लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने त्याला नोटीस पाठविल्या. मात्र त्या नोटिसींना उत्तर मिळाले नाही. यावर बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी कर्जाच्या वसुलीसाठी कांबळीच्या घरीही गेल्या होत्या. मात्र कांबळी याच्या पत्नीकडून अपमानास्पद वागणूक व मारहाणही करण्यात आल्याची तक्रार महिला अधिकाऱ्याने वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केली, तर दुसरीकडे अंद्रियानेही त्या अधिकाऱ्याविरोधात जबरदस्तीने घरात प्रवेश केल्याची तक्रार दाखल केली. मुदत उलटूनही कर्जाची अद्याप परतफेड होत नसल्याने बँकेने कायद्याचा अवलंब केला आहे. कांबळे याची पुरेशी मालमत्ता बँकेकडे तारण आहे. त्यामुळे बँक ही मालमत्ता जप्त करून आर्थिक नुकसान भरून काढेल. मात्र त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार असल्याने बँकेने कांबळीविरोधात सहकारी न्यायालयात धाव घेतली आहे.