विनय कोरे भाजपाच्या संपर्कात
By Admin | Updated: July 21, 2014 02:45 IST2014-07-21T02:45:50+5:302014-07-21T02:45:50+5:30
जनसुराज्य शक्ती पक्षाचे पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत

विनय कोरे भाजपाच्या संपर्कात
विश्वास पाटील, कोल्हापूर
जनसुराज्य शक्ती पक्षाचे पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत; परंतु भाजपातील प्रवेशाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडूनही कोरे यांच्यावर काहीतरी निर्णय घ्या, असा दबाव आहे. कोरे यांनी भाजपाचे नेते व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली.
भाजपाने त्यांना प्रवेश दिल्यास विधानसभेचा गुंताही सुटू शकतो. एकाचवेळी भारत पाटील व सत्यजित पाटील यांचा शिवसेना उमेदवारीचा पत्ता कट होऊ शकतो.
विकासाची दृष्टी, नेतृत्वगुण, चांगले संघटन असूनही कोरे यांचे नेतृत्व सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. पक्ष चालविणे हे आर्थिकदृष्ट्या न झेपणारे बनले आहेच, शिवाय स्वत: त्यांनाही पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेला संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याच पक्षाचे खंदे कार्यकर्ते भारत पाटील हे स्वाभिमानी किंवा शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील हेदेखील शिवसेनेतूनच लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज ठाकरेंशी चांगले संबंध असल्याने कोरे यांना शिवसेनेत जाण्यात अडचणी आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर त्यांना काँग्रेसमध्ये येऊ नका, असाच सल्ला दिल्याचे समजते.
नितीन गडकरी व कोरे यांचे १९९५ पासून घनिष्ट संबंध आहेत. मुंबईत एकाच अपार्टमेंटमध्ये या दोघांचे फ्लॅट असल्याने त्यांची अनेकदा भेट होते. आर्इंची प्रकृती बरी नसल्याने कोरे गेला दीड महिना मुंबईत होते. या काळात त्यांच्या दोन-तीन वेळा भेटी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही कोरे यांचे खूप जुने संबंध आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील एखादा खमका नेता पक्षात येत असेल तर भाजपालाही ते हवेच आहे.
विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे चार आमदार निवडून आले. गेल्या निवडणुकीत ही संख्या दोनवर आली. त्यातील मालेगावचे आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जनसुराज्यकडे पन्हाळा पंचायत समिती व नगरपालिकेची सत्ता आहे.