परळीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींचे ग्रामस्थांनी लावले लग्न
By Admin | Updated: December 31, 2015 01:00 IST2015-12-31T01:00:23+5:302015-12-31T01:00:23+5:30
तालुक्यातील तडोळी येथील अल्पभूधारक शेतकरी अवधूत रावसाहेब सातभाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून आत्महत्या केली. मात्र सातभार्इंच्या दोन्ही मुलींचे विवाह मंगळवारी
परळीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींचे ग्रामस्थांनी लावले लग्न
परळी : तालुक्यातील तडोळी येथील अल्पभूधारक शेतकरी अवधूत रावसाहेब सातभाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून आत्महत्या केली. मात्र सातभार्इंच्या दोन्ही मुलींचे विवाह मंगळवारी ठरलेल्या दिवशी रितीरिवाजाप्रमाणे लावण्यात आले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी गावकऱ्यांनीच मदतीचा हात पुढे केला.
भाग्यश्रीचा विवाह बेलंबा येथील बाबूराव गित्ते यांचे चिरंजीव तुकाराम, तर राजश्रीचा विवाह चांदापूर येथील सटवाजी गित्ते यांचा मुलगा मुक्ताराम सोबत पार पडला. दोन वर्षांपासून शेतात काहीच न पिकल्याने उपवर मुलींचे लग्न कसे करावे, असा प्रश्न सातभाई यांच्यापुढे उभा होता. लग्नासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मिळाले नाही. त्यामुळे सातभाई यांनी १२ दिवसांपूर्वी तडोळी शिवारातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे मुलींचा विवाह कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला. मात्र, ग्रामस्थांनी कुठल्याही स्थितीत ठरलेल्या वेळीच दोन्ही कन्येचा विवाह लावून सातभाई यांची इच्छापूर्ती करण्याचे ठरवले व त्यासाठी वर्गणी काढून सर्व जण कामाला लागले. यासाठी सरपंच अशोक सटाले, माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी व परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली. २५०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
या विवाहासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. धनादेश मंगळवारी लग्न मंडपातच मुलींच्या नातेवाईकांकडे देण्यात आला.
धनंजय मुंडे यांच्याकडूनही मदत
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २५ हजारांची मदत दिली. विवाहाला ते स्वत: उपस्थित होते. सातभाई यांच्या तिसऱ्या मुलीच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.