अपघात करणाऱ्या आमदाराच्या चालकाला ग्रामस्थांनी दिला चोप
By Admin | Updated: August 21, 2016 21:01 IST2016-08-21T21:01:53+5:302016-08-21T21:01:53+5:30
पाथरी मतदारसंघाचे आ. मोहन फड यांच्या आलिशान जीपने कारला धडक दिली.

अपघात करणाऱ्या आमदाराच्या चालकाला ग्रामस्थांनी दिला चोप
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 21 -पाथरी मतदारसंघाचे आ. मोहन फड यांच्या आलिशान जीपने कारला धडक दिली. यात पोलीस कर्मचाऱ्यासह तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी नित्रूडजवळ घडली. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मद्यधुंद चालकास चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
अपक्ष आ. फड यांना औरंगाबाद येथे सोडून चालक भगवान अप्पा भैरव (रा. वडवणी, जि. बीड) हा जीप (क्र. एम.एच.२२-०९०९) मधून तेलगावहून पाथरीकडे एकटाच जात होता. माजलगाव-तेलगाव रस्त्यावरील नित्रूड गावाजवळ त्याने कार क्र. (एम.एच.२१-व्ही-८१५२)ला धडक दिली. अंबाजोगाई येथील रहिवासी व जालना येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत चाटे, त्यांची पत्नी सुनीता व मुलगा नितीन हे तिघे जण या कारमधून जात होते. धडकेनंतर ते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात हलविले.
दरम्यान, आ. फड यांच्या जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला ग्रामस्थांनी चांगला चोप देऊन त्याला दिंद्रूड पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.