विखे पाटील तुमच्यावर आमचा भरवसा नाय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:04 IST2017-07-24T05:04:07+5:302017-07-24T05:04:07+5:30
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आधी घेण्याविषयी कोणाच्याही मनात दुमत नाही, पण राष्ट्रवादीला अंधारात ठेवून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील
विखे पाटील तुमच्यावर आमचा भरवसा नाय...
अतुल कुलकर्णी / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आधी घेण्याविषयी कोणाच्याही मनात दुमत नाही, पण राष्ट्रवादीला अंधारात ठेवून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुद्दाम विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र दिले व इंदिराजींच्या अभिनंदनाच्या ठरावावर आधी चर्चा करा अशी मागणी केल्याने राष्ट्रवादीने संतप्त भूमिका घेत विरोधकांच्या बैठकीकडे पाठ फिरवली.
पडद्याआड बैठका झाल्या. स्वत: शरद पवार यांनी फार ताणू नका. बैठकीला जा, असे सांगितले.पण विखे पाटील यांच्यावर भरवसा राहिलेला नाही. त्यांना जरा एक दिवस गॅसवर राहू द्या, असे सांगत स्वत: अजित पवार यांनी आजच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना ही सगळी घडामोड कळताच त्यांनी देखील विखे पाटील यांना चार शब्द सुनावले. राष्ट्रवादीशी विनाकारण भांडणे घेऊ नका, नाहीतर आम्हाला तुमच्याबाबतीतच वेगळा विचार करावा लागेल अशा शब्दात दिल्लीच्या नेत्यांनी विखेंना निरोप दिल्यानंतर विखे यांनी पत्रकार परिषदेत नमती भूमिका घेत आम्ही सोबतच आहोत, आमच्यात वाद नाहीत ,असे स्पष्ट केले.
मुळात शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव गेल्या अधिवेशनात मांडला गेला होता. मात्र काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडा अशी भूमिका घेतली. मागच्या अधिवेशनात ठराव येऊ शकला नाही. त्याचा राजकीय फायदा घेत भाजपाने दिनदयाल उपाध्याय यांचे नाव त्यात टाकले. पावसाळी अधिवेनाच्या आधी सर्व नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली व प्रोटोकॉल नुसार नावे घ्यावीत यावर राष्ट्रवादीनेही सहमती दर्शवली पण पडद्याआड वेगळ्याच घटना घडल्या. विधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांनी परस्पर इंदिरा गांधी यांच्या नावाचा आधी उल्लेख करावा अशा आशयाचे पत्र दिले तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची नावे टाकून तशाच आशायाचे दुसरे पत्र दिले गेले.
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना बैठकीसाठी विखेंनी फोन केला. पण जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या बैठकीला न जाण्याची भूमिका घेतल्याचे सांगून देशमुख यांनी बैठकीला जाण्याचे टाळले.
या पत्राविषयी राष्ट्रवादीला काहीही कल्पना दिली गेली नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असहकाराचे शस्त्र बाहेर काढले. त्यानंतर मात्र विखे यांनी अनेकवेळा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांना फोन केले. पण दोघांनीही फोन बंद ठेवले होते. तर धनंजय मुंडे यांनी विखेंचे फोन घेतलेच नाहीत. मात्र राणे यांनी तटकरेंना फोनवर गाठले. विखेंच्या वागण्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही, असे तटकरेंनी राणेंना सांगितल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी शरद पवारांनी अनेकवेळा फोन केले. फार ताणू नका, बैठकीला जा, असेही सांगितले. पण आम्हाला न सांगता पत्र पाठवण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे त्यांना धडा शिकवू द्या, उद्यापासून आम्ही एकत्र काम करु पण आज नाही, असे सांगून बैठकीला न जाण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. संघर्ष यात्रा एकत्र काढली, पृथ्वीराज चव्हाण एकत्र आणि सामोपचाराने लढण्याची भाषा बोलत आहेत, अशोक चव्हाण सोबत येण्याचे बोलतात मग एकट्या विखेंनाच का त्रास होतोय, असा सवाल राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला त्यावेळी विखेंच्या शिर्डीपासूनच्या भूमिकांची उजळणी केली गेल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.
दिल्लीकर नेत्यांचे पवारांना साकडे
दिल्लीतील काँग्रेसचे नेते आणि स्वत: राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सोबत घेण्याची भूमिका पडद्याआड घेतली आहे. काँग्रेसचे अनेक नेते पवारांना गेल्या काही दिवसात भेटले आहेत. तुम्हाला कोणी दुखावणार नाही, तुम्हाला महाराष्ट्रात जे हवे ते करुन मिळेल असा शब्दही त्यांना दिला गेला. त्यावेळी पवारांनी राज्यातल्या काँग्रेसचे कोणते नेते कसे वागत आहेत याचा पाढा वाचल्याचे वृत्त आहे. तुम्ही पुढाकार घेणार असाल तर विखेंना बदलू मात्र भाजपाच्या पराभवासाठी तुम्ही पुढाकार घ्या असे पवारांना सांगण्यात आले. विखेंनी घेतलेल्या भूमिकांमुळे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी दिल्लीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पण पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश हे विखे आणि माणिकराव ठाकरे यांची पाठराखण करत असल्याची चर्चा आहे.