वायुबाधेच्या घटनास्थळाची पाहणी
By Admin | Updated: December 1, 2014 02:10 IST2014-12-01T02:10:49+5:302014-12-01T02:10:49+5:30
शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले.

वायुबाधेच्या घटनास्थळाची पाहणी
उल्हासनगर : शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. ओटी सेक्शन विभागातील दुकाने बंद ठेवण्यात आली असून, वायुबाधितांनी साडेपाचशेचा आकडा गाठला आहे. अपर जिल्हाधिकारी अशोक सिंगारे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेऊन घटनेची माहिती घेतली आहे.
वालधुनी नदीपात्रात टँकरद्वारे घातक रासायनिक द्रव सोडल्याने नदीकिनाऱ्याच्या नागरिकांना त्रास झाल्याने शहरात खळबळ उडून हाहाकार उडाला होता. वायुबाधित नागरिकांवर वेळीच उपचार झाल्याने जीवितहानी टळली. टँकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती रुग्णालयात रविवारी सकाळी ११पर्यंत ५२७ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.
वायुबाधितांसाठी एक कक्षच तयार केल्याची माहिती डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली. या वेळी पालिकेचे उपायुक्त देवीदास पवार, उपविभागीय अधिकारी बी.जी. गावडे, तहसीलदार, पोलीस अधिकारी, प्रदूषण मंडळाने नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती उप प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे व मनोहर वाकळे यांनी दिली.
वायुबाधेच्या निषेधार्थ ओटी सेक्शन परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. अद्यापही उग्र दर्प येत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाप्रमुख महादेव सोनावणे यांनी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.