मुंबई : म्हाडाच्या अखत्यारीतील सर्व प्रादेशिक मंडळांची कार्यालयीन कागदपत्रे बघण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत वेबसाइटवर सर्व विभागांच्या वर्गवारीनुसार १५ कोटी कागदपत्रे पाहण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. यात विविध सूचना, निविदा, कार्यालयीन आदेश, कार्यालयीन टिप्पणी, प्रस्ताव मंजुरी यासारख्या दस्तऐवजाचा समावेश आहे.लॉटरीच्यावेळी नागरिकांची कागदपत्रे, माहिती यांचा यात समावेश नसेल. या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. त्यामुळे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करण्याची आवश्यकता कमी होईल. ही सेवा वापरण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर सिटीझन कॉर्नर या विभागातील डिपार्टमेंट वाईज रेकॉर्ड्समध्ये जाऊन अर्जदाराने लॉगिन करण्यासाठी माहिती नोंदवायची आहे. अर्जदाराने आधार किंवा पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर केवायसी ओटीपी पडताळणी पूर्ण होणार आहे. यानंतरच कागदपत्रे बघण्यासाठी उपलब्ध होतील. कोणतेही कागदपत्र डाऊनलोड करता येणार नाहीत अथवा त्यांचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत. कागदपत्रे पाहताना नागरिकांना कारण नमूद करणे बंधनकारक राहील. माहितीच्या सुरक्षिततेसाठी सायबर सिक्युअर लेअर आणि सेक्युरिटी ऑडिटचा अवलंब करण्यात आला आहे.
म्हाडाची १५ कोटी कागदपत्रे पाहा आता एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:45 IST