Vidhan Sabha 2019: चंद्रपूर वगळता सर्वच जिल्ह्यांत बंडखोरांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:54 AM2019-10-07T04:54:43+5:302019-10-07T05:02:22+5:30

भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना या बंडोबांची नाराजी दूर करण्यात अपयश आले तर अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो.

Vidhan Sabha 2019: Rebels challenge in all districts except Chandrapur | Vidhan Sabha 2019: चंद्रपूर वगळता सर्वच जिल्ह्यांत बंडखोरांचे आव्हान

Vidhan Sabha 2019: चंद्रपूर वगळता सर्वच जिल्ह्यांत बंडखोरांचे आव्हान

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीत बंडखोरी झाली असली तरी बंडखोरांचे सर्वाधिक आव्हान महायुतीपुढे आहे. कारण चंद्रपूरचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना या बंडोबांची नाराजी दूर करण्यात अपयश आले तर अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो. कोल्हापूर, लातूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोरांनी दंड थोपटले असून सोमावारी दुपारपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघातील लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

वर्धा जिल्हा
हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे उमेदवार समीर कुणावार यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. देवळी मतदारसंघात शिवसेना उमेदवार समीर सुरेश देशमुख यांच्या विरोधात भाजपचे वर्धा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

परभणी जिल्हा
परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि जिंतूर मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तर गंगाखेड मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात रासपचा उमेदवार उभा आहे.

हिंगोली जिल्हा
हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघात शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या विरोधात भाजपचे अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी केली आहे. तर कळमनुरीत शिवसेनेचे संतोष बांगर यांच्या विरोधात भाजपचेच माजी खा. शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे यांनी बंडखोरी केली आहे.

गोंदिया जिल्हा
गोंदिया मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या विरोधात भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी केली आहे. गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसचे विद्यमान माजी आमदार असून नुकताच त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

भंडारा जिल्हा
तुमसर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार चरण वाघमारे यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भंडारा मतदारसंघ युतीत रिपाइंला (आठवले गट) सोडण्यात आला असला तरी येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी केली आहे.

बीड जिल्हा
बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात भाजपचे आमदार लक्षमण पवार यांच्या विरोधात शिवसेनेचे बदामराव पंडित यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर आष्टी मतदारसंघात भाजप आमदार भीमराव धोंडे यांच्या विरोधात भाजपचेच माजी आमदार साहेबराव दरेकर आणि आ. सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनी बंडखोरी केली आहे.

अकोला जिल्हा
अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा यांच्या विरोधात डॉ. अशोक ओळबे, बाळापूरमध्ये शिवसेनेचे नितीन देशमुख यांच्या विरोधात भाजपचे माजी आ. नारायण गव्हाणकर, अकोटमध्ये भाजपचे प्रकाश भारसाकडे यांच्या विरोधात शिवसेनेचे अनिल गोवंडे आणि मूर्तीजापूरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांच्या विरोधात भाजपचेच राजकुमार नाचणे यांची बंडखोरी.

अहमदनगर जिल्हा
जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी यांच्या विरोधात शिवसेनेचे जि.प. सदस्य संदेश कार्ले, राहुरी मतदारसंघात भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात शिवसेनेचे गोविंद मोकाटे, कोपरगावमध्ये भाजपच्या आमदार स्रेहलता कोल्हे यांच्या विरोधात भाजपचे नगराध्यक्ष विजय वहाडणे तर शेवगावमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी बंडखोरी केली आहे. श्रीरामपुरात शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांचा अर्ज.

बुलडाणा जिल्हा
बुलडाणा मतदारसंघात शिवसेना उमेदवार संजय गायकवाड विरोधात भाजपचे योगेंद्र गोडे आणि शिवसेनेचेच माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी केली आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये शिवसेनेचे संजय घाटगे यांच्या विरोधात भाजपचे समरजित घाटगे, राधानगरीत शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात भाजपचे राहुल देसाई, शिरोळमध्ये शिवसेना आमदार उल्हास पाटील यांच्या विरोधात भाजपचे अनिल यादव, चंदगडमध्ये शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांच्या विरोधात भाजपकडून चौघांचे अर्ज , हातकणंगले मतदारसंघात शिवसेना आमदार सुजित मिणचेकर यांच्या विरोधात भाजपचे अशोकराव माने, तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी बंडखोरी केली आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर उत्तर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात शिवसेनेचे महेश कोठे, सोलापूर शहर मध्यमध्ये शिवसेनेचे दिलीप माने विरोधात शिवसेनेचे महेश कोठे, बार्शीत शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्या विरोधात भाजपचे राजेंद्र राऊत, करमाळ्यात शिवसेनेच्या रश्मी बागल यांच्या विरोधात शिवसेनेचे नारायण पाटील, पंढरपुरात रयतक्रांतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात शिवसेनेच्या शैला गोडसे, मोहळमध्ये शिवसेनेच्या नारायण क्षीरसागर यांच्या विरोधात शिवसेनेचेच मनोज शेजवल तर सांगोल्यात शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्या विरोधात भाजपच्या राजश्री पाटील मैदानात उतरल्या आहेत.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील खेड मतदारसंघात शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधात भाजपचे अतुल देशमुख, पुरंदरमध्ये शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्या विरोधात भाजपचे गिरीश जगताप आणि गणपतराव दगडे यांची बंडखोरी, खडकवासला मतदारसंघात भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात शिवसेनेचे रमेश कोडे, तर मावळमध्ये भाजप आमदार बाळा भेगडे यांच्या विरोधात भाजपचेच सुनील शेळके यांनी राष्टमवादीकडून अर्ज दाखल केला आहे. कसबा मतदारसंघात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या विरोधात शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी अपक्ष म्हणून तर कॅन्टोन्मेट मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. भरत वैरागे यांनी अर्ज दाखल केला आहे. पिंपरी मतदारसंघात शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी अमित गोरखे यांचा उमेदवारी अर्ज. तर चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांची बंडखोरी.

वाशिम जिल्हा
वाशिम मतदारसंघात भाजप उमेदवार लखन मलिक यांच्या विरोधात शिवसेनेचे निलेश पेंढारकर, कारंजामध्ये भाजपचे राजेंद्र पाटणी यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रकाश डहाके, रिसोडमध्ये शिवसेनेचे विश्वनाथ सानप यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

लातूर जिल्हा
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांच्या विरोधात भाजपचे रमेश कराड, अहमदपूरमध्ये भाजपचे उमेदवार आ. विनायक पाटील यांच्या विरोधात भाजपचेच दिलीपराव देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. औसा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या विरोधात भाजपचेच किरण उटगे, बजरंग जाधव आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी अर्ज दाखल केले आहेत.
उदगीर मतरदारसंघात भाजपने डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले विद्यमान आमदार सुधकार भालेराव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

जळगाव जिल्हा
जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे लक्ष्मण पाटील, मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, चोपडा येथे शिवसेनेच्या लता सोनवणे यांच्या विरोधात भाजपचे प्रभाकर सोनवणे, तर पाचोरा मतदारसंघात शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपचे अमोल शिंदे मैदानात
उतरले आहेत.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघात भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्या विरुद्ध भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, इस्लामपूरमध्ये शिवसेनेचे गौरव नाईकवाडी विरोधात भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिराळामध्ये भाजप आमदार शिवाजीराव नाईक विरोधात सम्राट महाडिक तर सांगलीत भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात भाजपचे जि.प. सदस्य शिवाजी डोंगरे आणि शेखर माने यांची बंडखोरी.

नाशिक जिल्हा
नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात भाजपचेच दिलीप भामरे, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आणि मामा ठाकरे यांचे अर्ज. नांदगाव-मनमाडमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे विरोधात शिवसेनेचेच राजेंद्र पवार आणि भाजपच्या मनिषा पवार यांची बंडखोरी. दिंडोरीत शिवसेनेचे भास्कर गावित यांच्या विरोधात शिवसेनेचे धनराज महाले यांचा अजर दाखल.

गडचिरोली जिल्हा
अहेरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विरोधात भाजपचे संदीप कोरेत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नागपूर जिल्हा
दक्षिण नागपुरात सर्वात जास्त प्रमाणात बंडखोरी बघायला मिळाली. भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले, शिवसेना नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे.
भाजपचे मनोज सिंह यांनी पश्चिम नागपुरातून अर्ज दाखल केला. रामटेक मतदार संघात राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते आशिष जैयस्वाल यांनी बंडखोरी केली आहे. सावनेरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडाचा झेंडा रोवला.

यवतमाळ जिल्हा
दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड यांच्या विरोधात भाजपचे संजय देशमुख, उमरखेडमध्ये भाजप उमेदवार नामदेव ससाने यांच्या विरोधात शिवसेनेचे डॉ. विश्वनाथ विणकरे, यवतमाळमध्ये भाजपचे उमेदवार आणि मंत्री मदन येरावार यांच्या विरोधात शिवसेनेचे संतोष ढवळे आणि गजानन इंगोले, आर्णीत भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांच्या विरोधात शिवसेनेच्या नयना शैलेश ठाकूर, अमोल मंगाम आणि माजी आमदार राजू तोडसाम यांची उमेदवारी. वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या विरोधात शिवसेनेचे विश्वास नांदेकर व सुनील कातकडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल.

मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. सावंत यांच्या जागी शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. वर्सोवा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेना आणि भाजपमधून बंडखोरी झाली आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी लव्हेकर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे.
गेल्यावेळी छाननी प्रक्रियेत पटेल यांचा अर्ज बाद झाला होता. त्यांच्यासोबत भाजपच्या दिव्या ढोले यांनीही बंडखोरी केली आहे. याशिवाय अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपचे मुरजी पटेल यांनी शिवसेना उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. शिवाजी नगर मानखुर्द येथे शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली आहे.
रिपाइंच्या गौतम सोनावणे यांनीही येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सोमवारी ते अर्ज माघार घेणार असल्याची घोषणा रिपाइंकडून करण्यात आली आहे.

कोकणातील बंडखोरी आज संपणार का? : रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही मतदार संघात शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आमनेसामने आहेत. कणकवलीत भाजप उमेदवार नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवार दिल्याने युतीत बिनसले आहे. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी बंडाचे निशाण उभारले आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019: Rebels challenge in all districts except Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.