Video: रणरणत्या उन्हात गोसावी समाजाचा संसार!
By Admin | Updated: April 18, 2017 17:27 IST2017-04-18T17:27:35+5:302017-04-18T17:27:35+5:30
ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 18 - विविध मागण्यांसाठी भटके गोसावी समाजाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडून अनोखे आंदोलन केले. ...

Video: रणरणत्या उन्हात गोसावी समाजाचा संसार!
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 18 - विविध मागण्यांसाठी भटके गोसावी समाजाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडून अनोखे आंदोलन केले. भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे उदय घाडगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. भविष्यात समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशारा या समाजाने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला.
गोसावी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुटुंबासह रणरणत्या उन्हात आंदोलनास बसले होते. लहान मुले हात वर करून उन्हाचे चटके सोसत आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा देत होते. काही महिला लहान मुले मांडीवर घेऊन बसल्या होत्या. उन्हातच त्यांनी चूल मांडून स्वयंपाक सुरू केला. उन्हाचा तडाखा वाढत होता; पण आंदोलक जागेवरून हटले नाहीत. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सावलीचा आधार घेतला; मात्र आंदोलक महिला व लहान मुलांनी जागा सोडली नाही. त्यांचे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याच ठिकाणी अवजड वाहतूक सेनेचा मोर्चा असल्याने भटके गोसावी समाजाला आंदोलनास जागाच मिळाली नाही. परिणामी त्यांना दिवसभर उन्हात बसून आंदोलन करावे लागले.
समाजासाठी अॅट्रॉसिटीसारख्या कडक कायद्याची तरतूद करावी, व्यवसायासाठी कोणत्याही बँकेत कर्ज देण्याची सोय करावी, समाजाला निवडणूक लढविण्यासाठी कायद्यात बदल करावा, उदरनिर्वाहासाठी शेतजमिनी कसून खाण्यासाठी द्याव्यात, मुलांच्या शिक्षणासाठी अनुदान द्यावे, महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी जाचक अटी लाऊ नयेत, अनेक गावांत हा समाज स्थायिक झाला आहे, त्यामुळे जागा व घरे बांधून मिळावीत, दारिद्र्यरेषेखालील यादीत नावे समाविष्ट करावीत, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला आंदोलन सादर करण्यात आले.
या आंदोलनात नीलाबाई घाडगे, कांचन गोसावी, सरस्वती चौगुले, गंगा घाडगे, उज्वला माळी, रामदास भोसले, सुवर्णा जाधव, शेवंता घाडगे, सागर टेंभूगडे, विजय सावंत, विजय जाधव, उज्वला माळी आदी सहभागी झाले होते.
https://www.dailymotion.com/video/x844vsz