VIDEO : नगर पाठोपाठ नाशिकमध्ये मराठा समाजाचा 'विराट' मोर्चा
By Admin | Updated: September 24, 2016 14:01 IST2016-09-24T10:20:56+5:302016-09-24T14:01:45+5:30
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर आज नाशिकमध्ये मराठ्यांचा आवाज घुमणार आहे.

VIDEO : नगर पाठोपाठ नाशिकमध्ये मराठा समाजाचा 'विराट' मोर्चा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २४ - कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवितानाच अन्य मागण्यांसाठी आयोजित मराठा क्रांती मोर्चास तपोवन येथून प्रारंभ झाला आहे. महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग असलेल्या या मोर्चासाठी जिल्ह्यातून लाखो मराठा नागरीक एकवटले असून या मराठा महासागराने कुंभ मेळ्यातील गर्दीच्या नाशिककरांच्या आठवणी जाग्या करून दिल्या आहेत.
मोर्चाच्या प्रारंभी सुसज्जित वाहनावर शिव प्रभूंचा पुतळा त्या पाठीमागे अश्वारूढ शिवराय असून शिवबा व जिजाऊंच्या वेशभूषेत मुले आणि मुली आहेत. लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला असून विविध राजकीय पक्षांचे नेते, शहराध्यक्ष , आमदार आदी सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून कार्य करताना दिसत आहेत. तपोवन येथे शिव प्रभूंना वंदन करून मोर्चा मार्गस्थ झाला असला तरी औरंगाबाद महा मार्गावर विंचुर, धुळे मार्गावर ओझर , चांदवड, सापुतारा मार्गावर दिंडोरी , पुणे महा मार्गावर शिंदे - पळसे तर मुंबई महा मार्गावर घोटी पर्यंत वाहतूक खोळंबली असून हजारो मोर्चेकरी रस्त्यात अडकून पडले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ मधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, शाळकरी विद्यार्थी, वकील, डॉक्टर्स अभियंते, साहित्यिक असे समाजातील सर्व घटक मोर्चात सहभागी झाले आहेत. राजकीय नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांनी मोर्चाची सूत्रे हाती घेतली असून हा मोर्चा पंचवटी , रविवार कारंजा, एम जी रोड सीबीएस मार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पोहोचणार असून तेथे मराठा पंचकन्या निवेदनचे वाचन करून ते जिल्हाधिकाऱ्यांना देतील. मोर्चाचा संपूर्ण मार्ग मराठा बांधवांनी ओसंडून वाहत असून संपूर्ण शहर भगवेमय होत गर्दीने फुलून गेले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मोर्चात सहभागी झाली असून त्या मुलांनी कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून टक्कल केले आहे.