VIDEO - हत्याराने भरलेले वाहन थेट मतदान केंद्रावर
By Admin | Updated: February 21, 2017 19:56 IST2017-02-21T19:56:24+5:302017-02-21T19:56:24+5:30
ऑनलाइन लोकमत पिंपरी, दि. 21 : मतदानाचा कालावधी साडेपाचला संपणार परंतू दहा मिनिटांचा कालावधी उरला असताना, नेहरूनगर येथील क्रांती ...

VIDEO - हत्याराने भरलेले वाहन थेट मतदान केंद्रावर
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 21 : मतदानाचा कालावधी साडेपाचला संपणार परंतू दहा मिनिटांचा कालावधी उरला असताना, नेहरूनगर येथील क्रांती चौकात हत्याराने भरलेले वाहन दाखल झाले. या वाहनातुन आलेल्या टोळक्याने मतदारांपैकी एका दांपत्याला अडवले. आम्हालाच मतदान करा. लक्षात ठेवा, असे धमकावले. आम्ही आताच मत देऊन आलो आहोत,कोणाला मतदान करायचे हा आमचा अधिकार असून तो अधिकार आम्ही वापरला आहे. असे त्या दांपत्याने सांगताच वाहनातुन उतरून दोन तीन जणांनी यमन्नप्पा वीटकर यांच्यावर हल्ला केला. महिलेला ढकलून दिले. वाहनात बसलेल्या एकाने बाहेर येऊन यमन्नप्पाच्या हातावर तलवारीने वार केले. यमन्नप्पा जखमी होताच, जमाव जमला, संतप्त जमावाने वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे या भागात तणावाची परिस्थिती उद्भवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहन ताब्यात घेतले.
मतदान करून आल्यानंतर भर चौकात टोळक्याने केलेल्या हल्यात पती यमन्नप्पा जखमी झाले. या प्रकरणी वनिता वीटकर (वय ३५,नेहरूनगर) यांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. तुम्ही आम्हालाच मतदान केले पाहिजे. असे धमकावुन एक प्रकारे दहशत माजविण्याचा प्रकार केला. असे वनिता वीटकर यांचे म्हणणे आहे. सामान्य माणसाने मतदान करायचे की नाही. माझे पती थोडक्यात बचावले. काय झाल असते, हे सांगता यत नाही. एम एच १४ इपी ९६६६ या क्रमांकाच्या वाहनातुन हल्लेखोर आले होते. या वाहनाच्या नंबरप्लेटवर कमळाचे स्टिकर आहे. असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी उपचारासाठी यमन्नप्पा यांना वायसीएम रूग्णालयात पाठवले. फिर्याद दाखल झाली तरी गुन्हा दाखल करण्याचे काम मात्र रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या उमेदवारावर हल्ला होण्याची घटना प्रभाग ९ मध्ये घडली होती. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉँग्रेसचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१,रा.नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. डोक्यात वार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी चपळाईने वार चुकविला. हाताला जखम झाली. सोमवारी रात्री ही घडलेली ही घटना ताजी असताना, मतदानाच्या दिवशी मंगळवारी भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याच्या हल्लयात एक जखमी झाला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.