VIDEO...त्यांना गणेशरुपात दिसला आरबाज
By Admin | Updated: September 5, 2016 22:19 IST2016-09-05T21:59:00+5:302016-09-05T22:19:28+5:30
गणेशोत्सव सार्वजनिक उत्सव म्हणुन साजरा केला जात असताना, या काळात अत्यंत गरजू अशा बालकाला स्वत:च्या घरी आणुन ११ दिवस जणू काही बालगणेशाचे आगमन झाले आहे.

VIDEO...त्यांना गणेशरुपात दिसला आरबाज
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. ५ - गणेशोत्सव सार्वजनिक उत्सव म्हणुन साजरा केला जात असताना, या काळात अत्यंत गरजू अशा बालकाला स्वत:च्या घरी आणुन ११ दिवस जणू काही बालगणेशाचे आगमन झाले आहे, या भावनेने त्याची सेवा करण्याचे व्रत योगेश मालखरे या काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्त्याने स्विकारले आहे.
गणेशोत्सवात घरोघरी गणेशमुर्तीची स्थापना केली जाते.रोज मनोभावे पुजा केली जाते,विसर्जनाच्या दिवसापर्यंत रोज विविध उपक्रमांचे आयोजन करून आनंदोत्सव साजरा केला जातो. सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असताना, या आनंददायी वतावरणात उपेक्षित घटकातील व्यक्तींच्या वाट्याला आनंदाचे काही क्षण यावेत, या उद्देशाने झोपडपट्टीतील मुलाला ११ दिवस घरी आणून त्याची मनोभावे सेवा करण्याचा उपक्रम मालखरे यांनी गतवर्षापासून सुरू केला आहे़ आरबाज खान नावाच्या लहानग्याला घरी आणून गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनोख्या उपक्रमाची चर्चा शहरभर पसरली आहे़
गणेश चतुर्थीच्यादिवशी बालगणेशाच्या रुपातील आरबाजला वाजत गाजत घरी आणले़ त्याला रोज नवनवीन कपडे देऊन पाहुणचार करून रोज ओवाळले जाणार आहे.
जाती,धर्म भेदाभेदाच्या पलिकडे माणुसकी आणि बंधुतेचे नाते जपण्याचा मालखरे यांचा प्रयत्न आहे. हे माणुसकीचे नाते केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न ठेवता, पुढे या गरिब मुलाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर गौराईचे आगमन होते. गौराईच्या स्वागतासाठी लातूरमधील अतिशय गरीब कुटूंबातील मनोरुग्ण असलेल्या पूजा जाधव या मुलीला गौरीच्या रुपात ते घरी आणणार आहेत. तीन दिवस तिची सेवा केली जाणार असून तिला नवीन कपडे देवून गोडधोड खायला दिले जाणार आहे. गणेशोत्सवानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय खर्चाची तयारी मालखरे यांनी दाखवली आहे. सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकता, बंधुता या तत्वाला बांधिल राहून काम करण्यासाठी स्माइल प्लस सोशल फ उंडेशनची स्थापना करून मालखरे यांनी विधायक कार्यात स्वत:ला झोकुन दिले आहे. या कामात त्यांना डॉ़ विजय गुजर, शेरखान पठाण, डॉ़ विजय गुजर, विवेक नेवाळे, सागर मिर्झापुरे यांच्याकडूनही सहकार्य मिळत आहे.