VIDEO- धक्कादायक! स्मशानभूमीच्या जागेसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको
By Admin | Updated: September 8, 2016 17:16 IST2016-09-08T17:07:32+5:302016-09-08T17:16:50+5:30
स्मशानभूमीकरिता जागा नसल्यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह वरवट बकाल-संग्रामपूर रस्त्यावर ठेवून तीन तास रास्ता रोको केला

VIDEO- धक्कादायक! स्मशानभूमीच्या जागेसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको
ऑनलाइन लोकमत
संग्रामपूर, (जि.बुलडाणा), दि. 8 - तालुक्यातील वरवट बकाल येथील बौद्ध समाज बांधवांना स्मशानभूमीकरिता जागा नसल्यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह वरवट बकाल-संग्रामपूर रस्त्यावर ठेवून तीन तास रास्ता रोको केला. त्यानंतरही मागणीची दखल घेण्यात न आल्याने ५ किलोमीटर मोर्चा काढून महिलांनी खांदा देत मृतदेह तहसील कार्यालयावर आणले. हा प्रकार ८ सप्टेंबर रोजी घडला.
तालुक्यातील वरवट बकाल येथील बौद्ध स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात सुरु होता. दरम्यान याप्रकरणी गत दोन महिन्यापूर्वी निकाल विरुध्द बाजूने लागला. दरम्यान ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील लिलाबाई बळीराम इंगळे (वय ७०) यांचा वृध्दापकाळाने मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेवर अंत्यसंस्कार कोठे करावा असा प्रश्न उपस्थित झाल्यावर गावातील पोलीस पाटील यांनी तहसिलदार व ठाणेदार यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार चव्हाण व ठाणेदार बळीराम गीते यांनी तात्काळ वरवट बकाल येथे हजर होवून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. ही चर्चा रात्री ९ वा. पासून ते सकाळी ४ वाजेपर्यंत सुरु होती. या चर्चेअंती मृतक महिलेचा दफनविधी हा वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावरील लेंडी नदीजवळील काठावर करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी मृतकाचे नातेवाईक मृतक महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लेंडी नदीजवळील काठावर गेले तेव्हा याठिकाणी काही बौध्द समाज बांधवांनी आम्हाला हक्काची व अधिकाराची स्मशानभुमी द्या, अशी मागणी ठाणेदार बळीराम गिते यांच्याकडे केली.
तर यावेळी तहसीलदार चव्हाण हे बुलडाणा येथे मीटींगसाठी गेले असल्याने ठाणेदार गिते यांनी तहसिलदार चव्हाण यांच्यासोबत याबाबत भ्रमणध्वनीवर चर्चा केली. मात्र यावेळी स्मशानभूमीसाठी कायमस्वरुपी जागेच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या बौध्द समाज बांधवांनी मृत वृध्द महिलेचे प्रेत वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावर ठेवले. या प्रकारामुळे सकाळी ११ वा. पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामगाव पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी ११ वा. पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रेत रस्त्यावर ठेवूनही स्मशानभुमीकरीता जागा मिळत नसल्यामुळे अखेर आंदोलक महिलांनी प्रेताला खांदा देवून हे प्रेत वरवट बकाल ते संग्रामपूर तहसील कार्यालयापर्यंत ५ किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयावर एकच खळबळ माजली होती.