VIDEO : वृक्षदानातून ते फुलवितात निसर्गाचा ‘वसंत’

By Admin | Updated: August 15, 2016 12:23 IST2016-08-15T12:11:57+5:302016-08-15T12:23:41+5:30

चंद्रपुरातील एका निसर्गवेडय़ाने निसर्गातूनच घेवून निसर्गासाठीच नागरिकांना दान करण्याचा उपक्रम मागील 16 वर्षापासून चालविला आहे.

VIDEO: 'Spring' of Nature flows from the tree | VIDEO : वृक्षदानातून ते फुलवितात निसर्गाचा ‘वसंत’

VIDEO : वृक्षदानातून ते फुलवितात निसर्गाचा ‘वसंत’

गोपालकृष्ण मांडवकर
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. १५ -  ‘आपणासी जे जे ठावे, ते इतरांशी सांगावे’ असे संतवचन आहे. या नुसार अनेकजण आपल्या संचयातून इतरांना दान देत असतात. मात्र चंद्रपुरातील एका निसर्गवेडय़ाने निसर्गातूनच घेवून निसर्गासाठीच नागरिकांना दान करण्याचा उपक्रम मागील 16 वर्षापासून चालविला आहे. 
वसंत तुकाराम घुगरे असे त्यांचे नाव. नावातच ‘वसंत’ असलेल्या या ध्येयवेडय़ाने वसुंधरेचा वसंत सदैव फुलता पाहण्याचे स्वप्न उरी बाळगले आहे. त्या स्वयंप्रेरणोतून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी नागरिकांना वृक्षदान करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. मूल तालुक्यातील जुनासुर्ला हे त्यांचे गाव. मुळात झाडीपट्टीतील गावात त्यांचे बालपण गेल्याने निसर्गाशी त्यांची जबरदस्त दोस्ती आहे. पुढे पोटापाण्यासाठी ते चंद्रपुरात स्थायिक झाले. येथील रामनगर परिसरातील शेंडे प्लॉटवर ते राहतात. औद्योगिकरणात चंद्रपुरात सिमेंट-काँक्रिटचे जंगल उभे झाले. रस्त्यालगतची कडूनिंबाची झाडे रूंदीकरणात कापली गेली. झाडीपट्टीत मन गुंतलेल्या वसंत घुगरे यांना ही बाब अस्वस्थ करायची. पर्यावरणाचा :हास थांबवून पुन्हा पक्षांचा चिवचिवाट कानी यावा, अवतीभवती झाडे बघायला मिळावी ही त्यांच्या मनातील अस्वस्थता होती. त्यांच्या या अस्वस्थतेला अखेर वाट मिळाली. चरितार्थ चालविण्यासोबतच  त्यांनी पदरमोड करून  घरी रोपांचे संवर्धन सुरू केले. झाडाखाली पडलेला पालापाचोळा जमा करून घरच्या घरी कंपोष्ट खत तयार करणो सुरू केले. लोकांनी रस्त्यावर फेकलेले पाण्याचे पाऊच, पॉलिथीन बॅग, पार्सलमधून अन्न नेल्यावर फेकून दिले जाणारे प्लास्टीकचे छोटे कंटेनर्स, डबे इतरांसाठी टाकाऊ असले तरी ते गोळा करण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यात रोपटी लावणो आणि ती मोठी झाल्यावर विद्यार्थी, नागरिकांना वाटून देणो हा त्यांचा नित्यक्रमच ठरला आहे. अलिकडे त्यांनी घरच्या घरी बोन्साय तयार करून अंगणात बोन्साय आणि रोपटय़ांची बाल्कनीच उभारली आहे. इच्छुकांना बोन्साय तयार करण्याचे ते प्रशिक्षणही देतात. तुळस, कोरफड, शतावरी, गुळवेल, एग्लोमा, पानफुटी, जांभुळ, अश्वगंधा, आवळा, बेल, करंजी, काशिद, बदाम, अशोक, सिताफळ, रामफळ, अमृतफळ, चिंच, फणस, आंबा, कडूनिंब, पानफुटी, गुलमोहर, क्रोटान यासह कितीतरी रोपटी आणि महावृक्षांच्या बोन्सायने त्यांचे अंगण व्यापून उरले आहे. 
स्वातंत्र्यदिनाचा मूहर्त साधून ही रोपटी ते वाटून देतात. रोपटी तयार करणो आणि मोठी झाल्यावर वाटणो हा त्यांचा जणू व्यासंग आहे. वर्षभरात ते किमान एक ते दिड हजारांवर रोपटी वाटतात. दिलेली रोपटी योग्य ठिकाणी लावण्यास आणि त्याची निट काळजी घेण्यासाठी सांगायलाही ते विसरत नाहीत. आपण जे करतो ते खुप मोठे काम आहे, अथवा इतरांहून वेगळे काही करतो याचा बडेजावपणा त्यांच्यात मुळीच नाही. पण निसर्गाच्या प्रेमापोटी सुरू असलेली या बारावी नापास माणसाची धडपड उच्चशिक्षीतांनाही लाजविणारी मात्र नक्कीच आहे.

Web Title: VIDEO: 'Spring' of Nature flows from the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.