व्हीडीओ - शेगाव कचोरी झाली ६६ वर्षाची
By Admin | Updated: August 5, 2016 21:28 IST2016-08-05T21:28:17+5:302016-08-05T21:28:17+5:30
स्वादिष्ट पदार्थांची आवड असणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शेगाव कचोरीला गुणवत्तेसाठी आयएसओ 9001;2008 मानांकन प्राप्त झाले आहे. शे

व्हीडीओ - शेगाव कचोरी झाली ६६ वर्षाची
शेगाव कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड
- फहीम देशमुख
शेगाव, दि. ५ : स्वादिष्ट पदार्थांची आवड असणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शेगाव कचोरीला गुणवत्तेसाठी आयएसओ 9001;2008 मानांकन प्राप्त झाले आहे. शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. शेगावची ही कचोरी हळूहळू विदर्भातच नव्हे तर आता संपूर्ण देशासह परदेशात सर्वत्र पोहोचली असून सुमारे ६६ वर्षांचा प्रदीर्घ पल्ला या कचोरिने गाठला असून कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे.
देशाच्या फाळणीनंतर तिरथराम शर्मा नामक व्यक्ती पंजाबातून शेगावांत पोहोचले. चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी 5 जून 1950 रोजी कचोरी सेंटर स्थापन करून तिरथराम शर्मा यांनी कुटुंबीयांना कायमस्वरूपी व्यवसायाचा मंत्र दिला. यामधे त्यांनी रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर हॉटेल सुरू केले. १९५० मध्ये आपल्या मुलांच्या मदतीने त्यांनी खास पद्धतीने तयार केलेल्या कचोरीची विक्री सुरू केली. शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भूरळ घातली आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने हा कचोरी निर्मिती आणि विक्रीचा वारसा यशस्वीपणे चालविला असून एकेकाळी एका आण्याला विकणारी ही कचोरी आज ५ ते ६ एवढ्या किमतीला विकली जात आहे.
शेगावला दरवर्षी हजारो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. येथे येणारा प्रत्येक जण कचोरीच्या लज्जतदारपणामुळे ती आपल्या गावालाही नेण्याचा मोह आवरू शकत नाही. आजवर जपलेली कचोरीची गुणवत्ता आणि यशाबाबत बोलताना तिरथराम शर्मा यांचे नातू बबली शर्मा यांनी सांगितले की, दर्जेदार बेसन आणि मैद्याच्या वापराबरोबरच कचोरी बनवताना एका विशिष्ट प्रकारचा मसाला ते आजवर वापरत आले आहेत. परिणामी कचोरीचा दर्जा टिकून राहिला असून या कचोरीमुळे शेगावचे नाव जागोजागी निघत असल्याने तेच खरे समाधान असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.एक प्रकारे खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवणारी टी. आर. शर्मा यांच्या हातची चव घेऊन आलेली कचोरी या घटकेला अनेकांचे पोट भरण्याचेही साधन ठरली आहे.
कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड
संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात शेगाव कचोरीची क्रेझ निर्माण झाली आहे.
शेगाव कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. दुबई येथील एका होटेल कंपनीशी शर्मा यांच्याशी करार झालेला आहे. ती यशस्वी झाल्यास शेगाव कचोरी दुबईत पोहोचणार आहे. यापूर्वी पाकिस्तान व जपानचा प्रवास तिने केला असून तेथील अनिवासी भारतीयांनी तिची लज्जत चाखलेली आहे.