अन्य महिला डॉक्टरांचेही व्हिडीओ रेकॉर्डींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 03:51 IST2016-08-24T03:51:57+5:302016-08-24T03:51:57+5:30
चमन धरमवीर चव्हाण (२१) याने अन्य डॉक्टर महिलांचेही व्हिडिओ रेकॉर्डींग केल्याचे तपासात समोर आले आहे.

अन्य महिला डॉक्टरांचेही व्हिडीओ रेकॉर्डींग
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून केईएम रुग्णालयात स्विपर म्हणून कार्यरत असलेल्या चमन धरमवीर चव्हाण (२१) याने अन्य डॉक्टर महिलांचेही व्हिडिओ रेकॉर्डींग केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे
अन्य गुन्ह्यांतही त्याला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चव्हाण हा पनवेल येथे कुटुंबियांसोबत राहतो. शस्त्रक्रिया विभागातील महिला डॉक्टरांच्या चेंजिंग रुममध्ये मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डींग केल्याप्रकरणी त्याला भोईवाडा पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तेथील महिला डॉक्टर शर्ट शोधत असताना त्यांच्या हाती मोबाईल लागला. आणि चव्हाणचे बिंग फुटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा हा प्रताप सुरु असल्याचा संशय आहे. याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती आहे. त्याने अन्य डॉक्टर महिलांचेही व्हिडीओ काढले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा मोबाईलमधील डाटा परत मिळविण्यासाठी मोबाईल
फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात
आला आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल
असे भोईवाडा पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ निरीक्षक तानाजी
सुरुलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>महिला स्वीपर नेमणार
रुग्णालय परिसरात अधिककाळ असणाऱ्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे यासाठी रुग्णालयांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. महिला डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांच्या चेजिंग रुममध्ये, त्यांच्यासाठी असणाऱ्या विश्रांती खोल्यांमध्ये पुरुष स्वीपर अथवा अन्य पुरुष कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार नाही. यापुढे या ठिकाणी महिला स्वीपर, महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात येणार आहे. चेजिंग रुममध्ये आवश्यक त्या वस्तूच यापुढे ठेवण्यात येतील. अडगळीच्या वस्तू काढल्या जातील.
>महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार
चेजिंग रुममध्ये आढळलेल्या मोबाईलच्या धक्कादायक प्रकारानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. महिला कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी रुग्णालय परिसर सुरक्षित करण्यासाठी महिला चेजिंग रुम अथवा अन्य ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची (स्वीपर, सर्व्हंट) नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केईएम प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिकेच्या तिन्ही प्रमुख रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जाणार असल्याची माहिती महापालिका प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. शुक्रवार, १९ आॅगस्ट रोजी केईएम रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरच्या कपडे बदलण्याच्या खोलीत एका स्वीपरने मोबाईल कॅमेरा व्हिडिओ मोडवर ठेवला होता.हा मोबाईल ठेवला असल्याचे एका महिला डॉक्टरच्या लक्षात आले.यानंतर त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. पण, असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केईएम रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर महिलांसाठी सुरक्षित कार्यक्षेत्र निर्माण करण्यासाठी काही बदल सुचवले आहेत.