राम देशपांडे/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 9 - पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा. त्या पत्रांतील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा, मायेची गुंफण असायची. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ई-मेल, एसएमएस, फेसबुक, व्हॉट्स अँपद्वारे क्षणात संदेश पोहोचविता येत आहेत. त्यामुळे एकेकाळी संपर्काचे माध्यम म्हणून मदतीला येणार्या पोस्टाच्या पत्रपेट्या जीर्णावस्थेकडे वाटचाल करीत असून, कालबाह्य होत असल्याचे दिसत आहे. डाक विभागाने शहरात उभारलेल्या पत्रपेट्यांपैकी, अनेक पत्रपेट्या काळाच्या ओघात जीर्ण होऊन नष्ट झाल्या आहेत. रंगरंगोटी करून अनेक पत्रपेट्यांचे रूप पालटले असले, तरी त्यांचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे. खदान परिसरातील शासकीय गोदामासमोरील पत्रपेटीचा लाल रंग शाबूत आहे; मात्र परिसरातील काही टपोरी पोरांनी तिचे कुलूप तोडले असून, त्यात दगड, मेनकापडाच्या पिशव्या व कचरा जमा झाला आहे. रात्रीच्या वेळी या पत्रपेटीच्या साक्षीने मद्याचे घोटदेखील रिचविले जात असल्याचे अवशेष तिच्या अवतीभोवती दिसून येतात. विश्वासार्हता लोप पावल्यामुळे पत्रपेटीचा वापर करण्यास नागरिक टाळाटाळ करतात. शहरातील अनेक पत्रपेट्यांची विश्वासार्हता अशा पद्धतीने लोप पावली असल्याने, अनेक गरजू नागरिक थेट डाकघर गाठत असल्याचे दिसून येते. एक काळ होता, जेव्हा दूरदर्शन आणि काही खासगी दूरचित्रवाहिन्यांवर काही नावाजलेल्या कार्यक्रमांनी टपाल खात्याला सुवर्णकाळ दाखविला. धडाक्याने होत असलेल्या पोस्ट कार्डांच्या विक्रीमुळे टपाल खात्याला चक्क निळय़ा रंगाची स्पर्धात्मक पोस्ट कार्डांची निर्मिती करावी लागली होती; मात्र आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट मोबाइलचे तंत्रज्ञान आले असल्याने, चॅटिंग, मॅसेजिंग, ई-मेल व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माहितीची देवाण-घेवाण त्वरित होऊ लागली आहे. त्यामुळे संदेशवहनाच्या प्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावणार्या पत्रपेट्यांना ग्रहण लागले असून, डाक विभागाचे अधिकारीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
--------------------------शहरातील पत्रपेट्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दोन हजारच्या दशकात पत्रपेट्यांमधून डाक जमा करण्यासाठी मोठे पोते बाळगावे लागायचे. बोटावर मोजण्याइतक्या पत्रपेट्याच सुस्थितीत असल्याने आता डाक आणण्यासाठी एक लहानशी पिशवी पुरेशी ठरते. - एस. एम. टिपरकारपोस्टमन, अकोला.