VIDEO : कपिल शर्माच्या मुखवट्याआडून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By Admin | Updated: September 9, 2016 12:39 IST2016-09-09T12:20:31+5:302016-09-09T12:39:06+5:30
कॉमेडी किंग कपिल शर्माप्रमाणे सामान्य मुंबईकरांच्या समस्या कधी सोडवणार असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.

VIDEO : कपिल शर्माच्या मुखवट्याआडून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - महापालिकेने आपल्याकडे ५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप कॉमेडी किंग कपिल शर्माने केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई महापालिकेने शर्मा यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ' ज्याप्रमाणे तुम्ही कपिलच्या आरोपाची गंभीर दखल घेत त्याचा प्रश्न लगेच सोडवलात त्याचप्रमाणे आमच्यासारख्या सामान्य मुंबईकरांकडेही लक्ष देवून त्यांचे प्रश्न सोडवा', अशी मागणी 'कपिल शर्मा'च्या मुखवट्याआडून काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी कपिलचा मास्क घालून शूट केलेल्या एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील अनेक समस्यांची आठवण करून देत त्याविषयी प्रश्न विचारले आहेत.
' मीही मुंबई महानगरपालिकेत होणार भ्रष्टाचार, रस्त्यावर पडलेले खड्डे, नालेसफाई, पाणीचोरी व अशा असंख्य प्रश्नांबद्दल आपल्याला पत्र लिहीले आहे, निवेदने दिली आहेत. त्या प्रश्नांसाठी मी अनेकवेळा मुंबई महापालिकेच्या पाय-याही झिजवल्या आहेत. पण आजपर्यंत कोणीही माझी दखल घेतली नाही, ऐकलं नाही. म्हणून आज आमच्यावर ' हम भी कपिल शर्मा' असं म्हणण्याची वेळ आली आहे. आता तरी तुम्ही आमचं ऐकाल ना?' असा सवाल नितेश यांनी विचारला आहे.