VIDEO: लातूर जिल्ह्यात तलावामुळे पर्यटन केंद्राचे स्वरूप

By Admin | Updated: August 1, 2016 16:34 IST2016-08-01T16:33:55+5:302016-08-01T16:34:20+5:30

लातूरच्या बरोबरीने पाणी टंचाईच्या ‘कळा’ सोसलेल्या उदगीरकरांचा आनंद सध्या ‘धरणात’ मावेनासा झाला आहे

VIDEO: The nature of tourist center due to lakes in Latur district | VIDEO: लातूर जिल्ह्यात तलावामुळे पर्यटन केंद्राचे स्वरूप

VIDEO: लातूर जिल्ह्यात तलावामुळे पर्यटन केंद्राचे स्वरूप

>ऑनलाइन लोकमत -
उदगीर, दि. 01 - लातूरच्या बरोबरीने पाणी टंचाईच्या ‘कळा’ सोसलेल्या उदगीरकरांचा आनंद सध्या ‘धरणात’ मावेनासा झाला आहे. जुलै अखेरच्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणारे बनशेळकी धरण तुडूंब भरुन ‘ओव्हरफ्लो’ झाले. धरणातील टंच पाण्याचा हा नजारा ‘याचि देही याचि डोळा’ साठविण्यासाठी प्रकल्पावर दररोज ८ ते १० हजार नागरिकांची हजेरी लागत आहेत.
 
उन्हाळ्यात थेंब थेंब पाण्यासाठी आसुसलेल्या उदगीरवर जुलैअखेर वरुणराजा प्रसन्न झाला. उदगीर शहराला पाणीपुरवठा करणा-या बनशेळकी धरणाच्या ‘कॅचमेंट’ क्षेत्रात तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला अन् धरण तुडूंब भरले. ही बातमी घागरभर पाण्यासाठी वणवण भटकलेल्या अन् थकलेल्या डोळ्यांनी टँकरची वाट पाहणा-या उदगीरकरांसाठी कोणत्याही ‘ब्रेकिंग’पेक्षा कमी नव्हती. शनिवारी रात्रीतून धरण ओव्हरफ्लो झाले़ हे वृत्त कळताच रविवारी सकाळी ६ वाजेपासूनच धरणाकडे जाणा-या रस्त्यावर वर्दळ झाली. सुट्टीचा दिवस अन् त्यात ही आनंदवार्ता, यामुळे दिवसभर नागरिकांची रीघ लागली.
 
पहिल्याच दिवशी जवळपास १० हजारांहून अधिक नागरिकांनी ‘पाणीपर्यटना’चा आनंद लुटला. हिरव्यागर्द निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धरणातील पाण्याचा नजारा डोळ्यात साठविण्यासाठी झालेली गर्दी कुतूहलाचाही विषय ठरला. डोळे दिपवणारे पाणी पाहून उपस्थित युवकांना पोहण्याचाही मोह आवरत नव्हता. पाण्याचा साठाच नसल्याने निसर्गाच्या कुशीत पोहण्याच्या आनंदापासून पारखे झालेल्या हौशी तरुणांनी बेभान होत प्रकल्पात उड्या टाकल्या. सोमवारी सुट्टी नसतानाही आसपासच्या भागातील नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने प्रकल्पाकडे धावत होते. एरवी धरणाकडे जाणा-या रस्त्यावर स्मशानशांतता असते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून हा रस्ता वाहनांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गेल्या वर्षभरापासून ‘पाणी पाणी’ करणा-या उदगीरकरांसाठी नजर जाईल तिथवर पाणीच पाणी हा नजारा अविश्वसनीयच वाटत होता. एकंदर भरलेल्या धरण परिसरात फुललेले पाणीपर्यटन हाही एक कुतूहलाचाच विषय बनला आहे.
 
खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले
पाणीपर्यटनासाठी गर्दी होत असल्याने काही व्यवसायिकांनी येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले आहेत. चिवडा विक्री करीत असलेल्या गणी मणियार यांनी सांगितले की, दररोज सायंकाळपर्यंत ८ हजारांवर नागरिक येथे भेट देत आहेत.
 
अगदी अविश्वसनीयच !
दोन घागरी पाण्यासाठी उन्हाळ्यात रात्र रात्र जागून काढल्या. त्याच उदगीरला पाणीपुरवठा करणारे बनशेळकी धरण तुडूंब भरल्याचे ऐकल्यानंतर झालेला आनंद शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. या आनंदाला वाट करुन देण्यासाठी मग पाय आपोआपच धरणाकडे वळले़ येथील पाणी पाहून अक्षरश: डोळे भरुन आले.
-रमेश कांबळे, उदगीर
 

Web Title: VIDEO: The nature of tourist center due to lakes in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.